लिपिक टंकलेखक कौशल्य चाचणीत सदोष कीबोर्डमुळे प्रभावित उमेदवारांसाठी पुन्हा चाचणी घ्या – आ. किशोर जोरगेवार

0
156

लिपिक टंकलेखक कौशल्य चाचणीत सदोष कीबोर्डमुळे प्रभावित उमेदवारांसाठी पुन्हा चाचणी घ्या – आ. किशोर जोरगेवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी, तात्काळ कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश

 

४ जुलै २०२४ ला एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखन पदाच्या कौशल्य चाचणीत कीबोर्डमध्ये बिघाड आल्याने अनेक उमेदवारांचे उतारे वेळेवर पूर्ण होऊ शकले नाहीत. त्यामुळे या उमेदवारांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेत सदर टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करून सदोष कीबोर्डमुळे प्रभावित उमेदवारांसाठी पुन्हा चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मागणीची तात्काळ दखल घेतली असून सदर बाब तपासून तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
एमपीएससी मार्फत लिपिक टंकलेखक या पदासाठी 7034 पदांची भरती 2023 मध्ये घोषित केली होती. संबंधित परीक्षेची प्री 30 एप्रिल 2023 आणि मेन्स 17 डिसेंबर 2023 ला सुरळीत पार पडली. यात स्किल टेस्टसाठी एकूण 21 हजार विद्यार्थी पात्र ठरले. नंतर 1 जुलैपासून संबंधित परीक्षेसाठी कौशल्य चाचणी पवई (मुंबई) येथील टीसीएसच्या सेंटरवर करण्यात आली होती. परंतु 1 जुलै 2024 ला सदर कौशल्य चाचणी केंद्रावर तांत्रिक अडचणी आल्यामुळे पुढील 3 दिवसांच्या परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
त्यानंतर दिनांक 4 जुलै 2024 रोजी ही परीक्षा घेतली गेली. मात्र यावेळी पुन्हा त्याच जुन्या कीबोर्डचा वापर केला गेला, ज्यातील काही कीबोर्ड सदोष होते. त्यामुळे काही उमेदवारांचे उतारे वेळेवर पूर्ण होऊ शकले नाहीत. हा प्रकार येथे हजर असलेल्या निरीक्षकाच्या लक्षात आणून देण्यात आला होता. मात्र उमेदवारांच्या तक्रारीला कुठलाही प्रतिसाद न देत सदर केंद्रावर कीबोर्ड बदलून दिले गेले नाहीत. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 5 जुलै 2024 ला सदर परीक्षा केंद्रावरील सर्व कीबोर्ड नवीन लावण्यात आले. त्यामुळे त्यादिवशीची कौशल्य चाचणी उत्तमरीत्या पार पडली.
4 जुलै 2024 ला कौशल्य चाचणी देणाऱ्या उमेदवारांची सदोष कीबोर्डवरती चाचणी घेतल्याने त्यांच्या कौशल्य चाचणीवर विपरीत परिणाम पडला आहे. त्यामुळे सदर उमेदवारांचे तांत्रिक अडचणींमुळे नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेता सदर चाचणी रद्द करून 4 जुलैला घेण्यात आलेल्या चाचणीत अडचणी आलेल्या उमेदवारांची पुन्हा चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. यावर सकारात्मक विचार केल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले असून याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here