घुग्घुस शहराच्या इतिहासात प्रथमच भव्य दिव्य कलश यात्रा
श्रीरामाच्या जयघोषाणे शहर दुमदुमले
घुग्घुस : येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा उत्सव समितीतर्फे सोमवार, २२ जानेवारी रोजी दुपारी श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त घुग्घुस शहराच्या इतिहासात प्रथमच भव्य दिव्य कलश यात्रा काढण्यात आली.
साडे पाचशे वर्षानंतर राम मंदिराचे निर्माण झाले आहे. २२ जानेवारीला या विशाल मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोठया भव्यतेने आयोजित करण्यात आला.
घुग्घुस शहरात सुद्धा हा उत्सव मोठया भव्यतेने साजरा करण्यात आला. जवळपास ४ ते ५ हजार महिलांची भव्य कलश यात्रा रावण दहन मैदान अमराई येथून काढण्यात आली सोबत १० ट्रॅक्टरवर विविध देवी देवतांच्या देखाव्यासह, झाकीयां, भजन, लेझीम पथकाचा समावेश होता. भव्य कलश यात्रेत लहान मुले, महिला, पुरुष, वयोवृद्ध असे जवळपास ८ ते १० हजार रामभक्त सहभागी झाले होते.
जय श्रीरामाच्या जयघोषाणे घुग्घुस शहर दुमदुमुन गेले तसेच ठिकठिकाणी भगवे तोरण, स्वागत गेट, बॅनर लावण्यात आल्याने घुग्घुस शहर भगवामय झाले होते आणि घुग्घुस शहराचे संपूर्ण वातावरण भक्तिमय होते.
विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेतर्फे शीतपेय, मसाला भात, पाणी बॉटल वाटप करण्यात आले. गांधी चौक, जुनाबसस्थानक, नवीन बसस्थानक मार्गे मार्गक्रमण करीत राम मंदिर रामनगर येथे कलश यात्रेचे समापन करण्यात आले. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते राम मंदिराच्या शेडचे लोकार्पण करण्यात आले.
राम मंदिर समितीतर्फे महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मोठया संख्येत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.