दुर्गंधीमुळे नागरिक हैराण — तोडगा निघेपर्यंत सिमेंट कंपनीचा घनकचरा प्रकल्प बंद
अमोल राऊत
संपादक
कोरपना:गडचांदूर शहरात सिमेंट कंपनीकडून केल्या जाणाऱ्या घनकचरा साठवणुकीमुळे निर्माण झालेल्या तीव्र दुर्गंधी व वाढत्या आरोग्यसमस्यांच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्ष निलेश ताजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत तोडगा निघेपर्यंत घनकचरा प्रकल्पाचे कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीस सर्व पक्षांचे गटनेते, मणिकगड सिमेंट कंपनीचे अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम
कंपनीत साठवण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे शहरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांमध्ये श्वसनास त्रास, अस्वस्थता आणि रोगराईचा धोका वाढत असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. नगराध्यक्षांनी स्पष्ट केले की —
“नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही.”
बैठकीतील प्रमुख चर्चा व निर्णय
१️⃣ दुर्गंधी नियंत्रणावर तातडीचा भर
कंपनीने आतापर्यंत केलेल्या उपाययोजना अपुऱ्या ठरल्याने, Bio-Enzyme Spray चा वापर मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. परिसर शक्य तितक्या लवकर दुर्गंधीमुक्त करण्याचे आदेश कंपनीला दिले.
२️⃣ कचरा वाहतुकीवरील नियंत्रण
कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर घाण सांडत असल्याच्या तक्रारींवर पोलिस विभागाला आदेश —
अनावश्यक कचरा वाहने शहराच्या हद्दीबाहेर ठेवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
३️⃣ Processing मधील त्रुटींवर कारवाई
कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया (Processing) न झाल्याने दुर्गंधी वाढत असल्याचे दिसून आले. त्यामुळे
➡️ घनकचरा प्रकल्प/डम्पिंग यार्ड प्रक्रिया तात्पुरती बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय झाला.
तोडगा निघेपर्यंत प्रकल्प सुरू न करण्याचे निर्देशही देण्यात आले.
पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन बंधनकारक
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातील सर्व अटींची पूर्तता कंपनीला करावी लागणार असून, संबंधित अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
नागरिकांना दिलासा — प्रशासन सतर्क
या निर्णयामुळे गडचांदूरकरांना मोठा दिलासा मिळाला असून, नगरपरिषद प्रशासनाने
स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे व आवश्यक ती पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.







