“जनवन विकास” योजनेतून चुनाळा शाळेला ई-लर्निग संच भेट
राजुरा : राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखड्याअंतर्गत वने व वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्रालगतच्या गावामध्ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन ‘जन-वन विकास’ साधण्यासाठी शासनाने ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास’ योजना सुरु केली आहे. या योजनेतून चुनाळा येथिल जिल्हा परिषद शाळेला ई-लर्निग संच (दि. ४) भेट दिला आहे.
यावेळी चुनाळा ग्राम पंचायतीचे सरपंच बाळनाथ वडस्कर, राजुरा वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, क्षेत्र सहाय्यक प्रकाश मत्ते, वनरक्षक मारोती चापले, मुख्याध्यापिका अनिता डंबारे व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
‘जन-वन विकास’ योजनेच्या माध्यमातून गावांतील जन-जल-जंगल-जमीन या संसाधनाचा शाश्वत विकास साधून उत्पन्न, पर्यायी रोजगार संधी वाढविणे व संरक्षित क्षेत्रावरील मानवी दबाव कमी करणे. संरक्षित वनक्षेत्रांच्या संरक्षण व संवर्धनामध्ये ग्रामस्थांचे योगदान घेणे. मानव- वन्यजीव यांच्यामधील संघर्ष कमी करून सहजीवन प्रस्थापित करणे, वन व वन्यजीव संवर्धनातून मिळणारे फायदे ग्राम विकासकरिता वापरणे, गावनिहाय सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करून गावांचा परिस्थितीनिहाय विकास साधण्यासाठी सर्व विभागांच्या योजनेतील तरतुदींची सांगड घालून एकात्मिक व नियोजनबद्धरित्या विकास घडविणे आहे. यादृष्टीकोनातून गावातील विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण घेता यावे याकरिता ई-लर्निग संच शाळेला भेट दिला आहे.