तहसील कार्यालयावर धडकणार शासकीय भरती कंत्राटीकरण विरोधात जनतेचा भव्य जनआक्रोश मोर्चा
राजुरा, १६ सप्टेंबर : महाराष्ट्र सरकारने नुकताच ६ सप्टेंबर २०२३ ला जीआर काढून शासकीय सेवेतील पदभरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला. यामुळे गरीब व होतकरू मुलांचे भविष्य दावणीला लागणार आहे. दिवसरात्र अभ्यास करून शासकीय नोकरीला लागण्याचे तरुणांचे स्वप्न आता भंगणार आहे. या निर्णयामुळे आरक्षण सारख्या संवैधानिक महत्वाच्या मुद्द्यालाही निकामी करत केवळ कागदावरच ठेवत व सामाजिक सोहार्द बिघडवत राज्यातील तरुणांच्या आयुष्याशी खेळ मांडला आहे. या निर्णयामुळे आरक्षणाला काहीही महत्व उरणार नसून गरिबी व दरिद्रता राज्यातील जनतेच्या नशिबी मारण्याचा जाचक डाव राज्यकर्त्यांनी मांडला आहे.
विद्यमान राज्यकर्त्यांच्या या जाचक निर्णयाविरोधात संपुर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले असून राजुरा शहरात तालुक्याच्या ठिकाणी भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून सदर निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा व राज्यातील बहुजन मुलांच्या शिक्षणाच्या घटनादत्त अधिकारावर घाला घालणाऱ्या बासश्ट हजार शाळांना कॉर्पोरेट क्षेत्रातील खाजगी कंपन्यांना देण्याचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यात येणार आहे.
१८ सप्टेंबरला राजुरा येथे सरकारी नोकऱ्यांचे कांत्राटीकरण व सरकारी शाळांच्या छुप्या खाजगीकरणा विरोधात राजुरा येथे भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन पुरोगामी विचारमंच तर्फे करण्यात आले आहे. सदर मोर्चा संविधान चौक – नका नं ३ – भरत चौक – गांधी चौक – नेहरू चौक – आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय येथे पोहचणार आहे. अशी माहिती पत्रकार भवन राजुरा येथे आज पार पडलेल्या पत्रपरिषदेत मोर्चा आयोजकांनी दिली. यावेळी अमोल राऊत, दिनेश पारखी, मधुकर कोटणाके, धीरज मेश्राम, संतोष कुळमेथे, संभाजी साळवे उपस्थित होते.
मराठा सेवा संघ राजुरा, अफ्रोट राजुरा, छावा फाऊंडेशन राजुरा, बिरसा क्रंतिदल राजुरा, भारतीय बौद्ध महासभा राजुरा, महात्मा फुले समाजसुधारक मंडळ राजुरा, स्वराज्य आधार फाउंडेशन राजुरा, जमाते इस्लामे हिंद राजुरा, संत रविदास फाउंडेशन राजुरा, पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती राजुरा, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ राजुरा, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक) राजुरा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था राजुरा, विदर्भ तेली महासंघ राजुरा, नागवंश युथ फोर्स राजुरा, आदिवासी टायगर सेना राजुरा, गोंडवाना समग्र क्रांती आंदोलन राजुरा, अखिल भारतीय ओबीसी कर्मचारी महासंघ राजुरा, संघर्ष वाहन चालक मालक संघटना राजुरा, राज गोंडवाना गड संरक्षण समिती राजुरा, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद राजुरा, हजरत टिपू सुलतान फाउंडेशन राजुरा, बिरसा सेना राजुरा, महाराष्ट्र नाभिक महासंघ राजुरा, महाराष्ट्र ग्राहक पंचायत संघटना राजुरा आदी संघटना यात सहभागी होणार असून शहरातील व तालुक्यातील जनता बहुसंख्येने सहभागी असेल, असे यावेळी सांगण्यात आले. सदर मोर्चाला महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्हा शाखा चंद्रपूर आणि अखिल भारतीय सरपंच परिषद महारष्ट्र राज्य या दोन्ही संघटनेचा जाहिर पाठिंबा मिळाला आहे.