जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी घेतली भुस्खलनग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात आढावा बैठक
भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची उपस्थिती
सोमवार, ३ मार्च रोजी चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी घुग्घुस येथील अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात आढावा बैठक घेतली या बैठकीत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थित होते.
घुग्घुस येथील अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्तांना घरांसाठी देण्यात येणाऱ्या जागेचे पट्टे वाटपाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने शासन स्तरावर पाठविला आहे तसेच भुस्खलनग्रस्तांना ६ महिने देऊ केलेले घरभाडे आणि घरे बांधून देण्याच्या निर्णयासंदर्भात या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आढावा घेतला.
यावेळी उपविभागीय अधिकारी मरूगनांथम एम., प्रशासन अधिकारी अजीत डोके, सुर्यवंशी मॅडम यांसह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
फेब्रुवारी महिन्यात नियोजन भवनात पार पडलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्त १६९ बाधित कुटुंबीयांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात याव्या अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
२६ ऑगस्ट २०२२ रोजी घुग्घुस येथील अमराई वार्डात भुस्खलनाची घटना घडली होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने १६९ कुटुंबीयांना इतरत्र स्थलांतरीत करण्यात आले होते. या कुटुंबियांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. घुग्घुस येथील भुस्खलनग्रस्त कुटुंबियांच्या पुनर्वसनाचा आढावा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भावनात घेण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, उपविभागीय अधिकारी मुरुगनांथम एम. व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व भुस्खलनग्रस्त कुटुंबीय उपस्थित होते.
गत सहा महिन्यात पीडित कुटुंबियांच्या राहण्याची व्यवस्था इतरत्र करण्यात आली असली तरी घरभाड्याकरीता देण्यात आलेली रक्कम संपली आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्याची रक्कम वेकोलिने त्वरीत द्यावी. १६९ कुटुंबियांसाठी जिल्हा प्रशासनाने घरासाठी जागा निश्चित करून त्याठिकाणी पाणी, वीज, रस्ते आदींची सुविधा उपलब्ध करून देणे अशा आवश्यक सूचना पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या.
यापूर्वी घटना घडल्यानंतर आठ दिवसाच्या आत पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० हजार रुपयांची आर्थिक मदत, भाजपा घुग्घुसतर्फे ३ हजार रुपयांची मदत व जीवनावश्यक वस्तूंची किट देण्यात आली होती.
फेब्रुवारी महिन्यात २० तारखेला वेकोलि वसाहतीच्या शिवनगर परिसरातील पर्यायी जागेची पाहणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, नायब तहसीलदार सचिन खंडाळे, मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्त कुटुंबियांनी केली होती.