सकारात्मक ध्येयविहीनता अनेक समस्यांचे मूळ – डॉ.स्वानंद पुंड
निसर्गामध्ये आपल्या बुद्धिमत्तेच्या माध्यमातून सर्वश्रेष्ठ असणारे आणि संस्कृतीच्या दृष्टीने पूर्व पुण्याईने प्राप्त होणारे मानवी जीवन ही आपल्याला मिळालेली अलौकिक देणगी आहे. केवळ पोटापुरता विचार न करता व्यक्तिगत उन्नती साधत मानसिक आणि बौद्धिक आनंद प्राप्त करणे केवळ माणसालाच शक्य आहे. अशा जीवनात उच्च सकारात्मक ध्येय ही मानवी जीवनाची वैभव संपन्नता असते. जीवनामध्ये अशा सकारात्मकतेच्या अभावातच नैराश्यापासून आत्महत्येपर्यंतच्या अनेक समस्या भेडसावत असतात. जीवनातील ही नकारात्मकता दूर करत आपले आयुष्य उच्च ध्येयाला समर्पित करण्यातच खरा पुरुषार्थ आहे. असे विचार विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या औषधी निर्माण शास्त्र विभागातर्फे आयोजित कार्यशाळेमध्ये ते व्यक्त होत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी औषधी निर्माण विभागाचे प्राचार्य डॉ. सुधाकर रेड्डी उपस्थित होते.
समाजामध्ये प्राधान्याने विद्यार्थी वर्गामध्ये वाढत असलेले नैराश्य आणि आत्महत्येचे प्रमाण पाहता भारत शासनाच्या शिक्षण विभागाद्वारे प्राप्त आदेशानुसार विद्यार्थ्यांमध्ये तणाव व्यवस्थापन करीत सकारात्मक भूमिकेची रुजवण करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
आपल्या व्याख्यानात पशु आणि मानवा मधील भेद वेगवेगळ्या पद्धतीने उलगडून दाखवत केवळ खाणे,पिणे, झोपणे एवढेच मानवी जीवन नसून शारीरिक पातळीच्या वर उठत साहित्य, संगीत, कला इत्यादी माध्यमातून मानसिक आणि बौद्धिक आनंद प्राप्त करण्यासाठी मानवी जीवन आहे हे स्पष्ट करीत नैराश्य दुर्बलतेचे लक्षण असून सकारात्मक ध्येयासाठी जीवन समर्पित करणे हाच सर्व समस्यांवरील उपाय आहे. माता,पिता आणि गुरु यांना आनंद देण्यासाठी आपल्या जीवनाचा सदुपयोग करावा असे निरूपण डॉ. स्वानंद पुंड यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शमसून अन्सारी आणि साक्षी श्रीवास्तव यांनी केले.