क्रिडा क्षेत्रात उत्‍तम काम करणारी संस्‍था म्‍हणजे क्रिडा भारती – ना. मुनगंटीवार

0
630

क्रिडा क्षेत्रात उत्‍तम काम करणारी संस्‍था म्‍हणजे क्रिडा भारती – ना. मुनगंटीवार

क्रिडा भारतीच्‍या विदर्भ प्रांत अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्थिती

नागपूर,दि.२८: व्‍यक्‍तीच्‍या मानसिक स्‍वास्‍थ्‍याबरोबर शारीरिक स्‍वास्‍थ्‍य उत्‍तम असणे ही आवश्‍यक गोष्‍ट आहे. त्‍यासाठी कुठल्‍यातरी क्रिडा प्रकाराशी प्रत्‍येकाने संलग्‍न असणे आवश्‍यक आहे. त्‍यादृष्‍टीने क्रिडा भारती क्रिडा क्षेत्रामध्‍ये लोकांना जोडणारे काम करीत आहे ही अतिशय कौतुकास्‍पद बाब आहे व त्‍याबद्दल मी त्‍यांचे अभिनंदन करतो, असे प्रतिपादन महाराष्‍ट्र राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

कार्यक्रमाला अध्‍यक्ष म्‍हणून श्री. विजय मुनीश्‍वर, प्रमुख अतिथी म्‍हणून क्रिडा भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री प्रसाद महानकर, अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, स्‍वर्णिम गुजरात क्रिडा विद्यापीठाचे कुलगुरू श्री. अर्जुनसिंग राणा, अखिल भारतीय कार्यकारीणी सदस्‍य श्रीमती मधु यादव, क्रिडा भारतीची विदर्भ प्रांत उपाध्‍यक्ष डॉ. योगेश सालफळे, शहर अध्‍यक्ष शरद सुर्यवंशी, संजय लोखंडे उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना ना. मुनगंटीवार म्‍हणाले की,हे वर्ष देशाच्‍या स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवाचे आहे. त्‍यामुळे यावर्षी क्रिडा भारतीने जास्‍तीत जास्‍त खेळाडूंपर्यंत पोहण्‍याचा प्रयत्‍न करावा व जास्‍तीत जास्‍त विद्यार्थ्‍यांना खेळासाठी उद्युक्‍त करावे. मी राज्‍यात सांस्‍कृतीक विभागाचा मंत्री आहे. येणारे वर्ष हे छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या राज्‍य अभिषेकाचे ३५० वे वर्ष असणार आहे. जुन २०२३ ते मे २०२४ पर्यंत या निमीत्‍ताने राज्‍यामध्‍ये निरनिराळे कार्यक्रम विभागातर्फे आयोजित केले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंब तलवार व अफजल खानाचा वध करणारी वाघनखे इंग्‍लंडमधील संग्रहालयात ठेवलेली आहेत. मी इंग्‍लंडच्‍या पंतप्रधानांशी पत्रव्‍यवहार करून या वस्‍तु भारताला परत करण्‍यासंदर्भात विनंती केली आहे. इंग्‍लंडच्‍या सरकारने या संदर्भात सकारात्‍मक भुमीका घेतली असून यासंदर्भात लवकरच चांगला निर्णय होईल याची मला खात्री आहे.

संपूर्ण महाराष्‍ट्रात स्‍मार्ट सिंथेटीक ट्रॅक हे फक्‍त तीन ठिकाणी आहेत. मला सांगायला अतिशय आनंद होतो की हे तिन्‍ही ट्रॅक चंद्रपूर जिल्‍हयात आहेत. सैनिक स्‍कुल, बल्‍लारपूर स्‍टेडियम व चंद्रपूर स्‍टेडियम या ठिकाणी हे ट्रॅक आहेत. यामुळे खेळाडूंना सराव करण्‍यास मदत होते व ऑलिम्‍पीक स्‍तरावर जाण्‍यासाठी खेळाडूंना प्रोत्‍साहन मिळते, असे ना. मुनगंटीवार याप्रसंगी म्‍हणाले.

‘बुंद बुंद से सागर बनता है और व्‍यक्‍ती व्‍यक्‍ती से देश बनता है’  हे सुत्र ठेवून क्रिडा भारती काम करीत आहे याचा मला अतिशय आनंद आहे. अनेक राष्‍ट्रीय व आंतराष्‍ट्रीय खेळाडू या संस्‍थेशी जुळले आहेत व पुढेही नवनविन सदस्‍य या संस्‍थेशी जुळतील याची मला खात्री आहे असे याप्रसंगी ना. मुनगंटीवार म्‍हणाले.

याप्रसंगी विद्यार्थ्‍यांनी निरनिराळी प्रात्‍यक्षीके सादर केली तसेच जुन्‍या काळातील शस्‍त्रातांचे प्रदर्शनही यावेळी ठेवण्‍यात आले. कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भातुन क्रिडा भारतीचे पदाधिकारी, क्रिडा शिक्षक तसेच विविध क्रिडा प्रकारातील खेळाडू उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here