ग्रामपंचायतींच्या कामात मोजक्याच कंत्राटदारांची मक्तेदारी
राजुरा तालुक्यातील वास्तव टक्क्यांचे अर्थकारण
राजुरा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सिव्हिल कामात काही मोजक्याच कंत्राटदारांचा बोलबाला असून त्यांच्याकडे एक- दोन नव्हे तर ८ ते १० ग्राम पंचायतीमधील कामांचा पसारा असल्याची माहिती आहे. त्यामुळे काही कंत्राटदार ‘काम देता का काम’ म्हणत भटकत आहे. पण त्यांच्या हाताला काम मिळत नसल्याची ओरड आहे. मुळात ग्रामपंचायतमधील काही कंत्राटदारांची मक्तेदारी ही निव्वळ टक्क्यांच्या अर्थकारणावर सुरू असल्याची चर्चा आहे.
ग्रामस्तरावर असलेल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते. यात नाली व रस्त्यासह लहानमोठ्या सिव्हिल कामांचा समावेश असतो. काही कामांच्या निविदा निघत नसल्याने ग्राम पंचायत स्तरावर कामे केली जाते. यामध्ये ६ ते ७ लाखांच्या कामांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या कामांची एजन्सी स्वतः ग्रामपंचायत असल्याचे दाखवून विशिष्ट कंत्राटदाराकडून कामे केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. मुळात काम देताना यात टक्क्यांचे अर्थकारण दडले असल्याचे बोलले जात आहे. जो ‘टक्का’ जास्त देतो त्या कंत्राटदाराला काम देण्याची घाई असते. सध्या तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये काम देताना ‘टक्का बोलता है’ अशी स्थिती आहे. त्यामुळे काही कंत्राटदारांना काम मिळत नसल्याने त्यांची भटकंती सुरू आहे.
आजघडीला तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये बोटावर मोजण्या एवढेच कंत्राटदार काम करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून घुसखोरी केल्याची चर्चा आहे. अर्थात ही घुसखोरी वाढीव टक्क्यांमुळे होत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे एका एका कंत्राटदाराकडे ८ ते १० ग्रामपंचायतींमधील कामांचा पसारा असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे काही कंत्राटदार कामाच्या शोधत वणवण भटकत आहे. कंत्राटदारांची मक्तेदारी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.