कटाक्ष:बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती? जयंत माईणकर
ही गोष्ट आहे तीस वर्षांपूर्वीची! खंडप्राय असलेल्या भारत देशात सर्वदूर तेव्हा आणि आजही असलेल्या काँग्रेसशी मुकाबला करण्यासाठी प्रादेशिक पक्षांची एकजूट असलेली राष्ट्रीय मोर्चा (national front) या नावाची एक पहिली सर्वसमावेशक छत्री उघडण्यात आली.त्यापाठोपाठ
सर्व डावे कम्युनिस्ट पक्ष लेफ्ट फ्रंट किंवा वामपंथी मोर्चा या नावाने ओळखले जाऊ लागले. भाजपने आपणही तथाकथित सर्वसमावेशक आहोत हे दाखविण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (National Democratic Alliance) नावाची छत्री उघडली गेली.या छत्रीत येणारे अगदी पाहिले पक्ष होते शिवसेना, अकाली दल आणि जनता दल (युनायटेड). २००४ ला भारतीय राजकारणाची दिशा बदलली आणि काँग्रेसला स्वतःची सर्वसमावेशकता दाखविण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी (United Progressive alliance)नावाची चौथी छत्री उघडावी लागली. अर्थात राष्ट्रीय मोर्चा नावाच्या छत्रीचे मोजता येणार नाहीत इतके तुकडे झाले होतें तर लेफ्ट फ्रंट आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजे बंगाल आणि केरळमध्ये कमजोर होत होती. आणि भारतीय राजकारणातील हे दोन्ही राजकीय घटक संपुआला मदत करत राहिले आणि त्यामुळेच काँग्रेस दहा वर्षे सत्तेवर राहिली.
पण २०१४ साली ही परिस्थिती बदलली.बाबरी विध्वंस या घटनेच्या भरवशावर लोकसभेत १८३ ही सर्वोच्च संख्या गाठणार्या भाजपला जोड मिळाली ती गोध्रा दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंदु मसीहा ही इमेज प्राप्त झालेले नरेंद्र मोदी २०१४ पासून बहुमताने दोन वेळा सत्तेत आले आणि भाजपला हळुहळु रालोआ नावाच्या छत्रीपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या साह्याने उघडलेली हिंदुत्वाची छत्री जास्त मोठी वाटू लागली आणि इथेच रालोआतील एकेक सहकारी गळून पडू लागले. त्याची सुरुवात प्रथम शिवसेनेनी २०१४ ला केली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची साथ सोडून. त्यावेळीही आज २०१९ मध्ये महाराष्ट्रात घडलेलं नवं राजकीय समीकरण मांडण्याची तयारी झाली होती. पण शिवसेनेने
कच खाल्ली आणि पाच वर्षे ते भाजपबरोबर राहिले. पण २०१९ला विधानसभा एकत्र लढूनही मुख्यमंत्री पदाच्या साठी नवीन राजकीय समीकरण तयार झालं आणि भाजपने रालोआ तील आपला खंदा ‘हिंदुत्ववादी’ सहकारी गमावला. काहीसा तोच प्रकार बिहारमध्ये २०१५ पासून होत असून या निवडणुकीनंतर तिथेही पुन्हा महाराष्ट्राचीच पुनरावृत्ती होऊ शकते.
नितीशकुमार मुळचे समाजवादी! राममनोहर लोहिया ,जयप्रकाश नारायण यांचे शिष्य! त्यांनी २०१५ ला लालू प्रसाद आणि काँग्रेस च्या साह्याने बिहारमध्ये महागठबंधन या नावाखाली निवडणूक लढवून विजयी झाले . कुर्मी समाजाचे असलेले नितीशकुमार यांचा स्वतः च असा एक मतदारसंघ असून त्याच्या भरवशावर त्यांनी ७१ जागा जिंकल्या तर राष्ट्रीय जनता दलाने ८० आणि काँग्रेसने चक्क २७. तरीही लालूप्रसाद यादवांनी नितीशकुमारना मुख्यमंत्री पद दिलं. भाजपची मजल ५३ पर्यंत होती.दोन वर्षं हा संसार चालला पण २०१७ ला पुन्हा नितीशकुमार यांनी भाजपबरोबर घरोबा केला आणि गेली तीन वर्षे ते भाजपबरोबरच आहेत. आताही त्यांचा भाजपबरोबरच निवडणूकपूर्व समझोता झाला असून नितीशकुमार १२३ आणि भाजप 121 जागा लढणार आहेत तर तिकडे राजद , काँग्रेसआणि डावे पक्ष यांच्यातही समझोता झाला आहे. अर्थात वरकरणी दिसत असलं तरी आत भाजप आणि जद (यु) मध्ये सगळं आलबेल आहे असं नाही. आणि ज्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने भाजप कडे हट्ट धरला आणि तो पूर्ण न झाल्याने नवा घरोबा केला काहीसा तसाच प्रकार बिहारमध्ये घडण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये भाजपने उपमुख्यमंत्री म्हणून सुशीलकुमार मोदी यांना कायम ठेवल आहे. बिहारमधील दलितांमध्ये काही प्रमाणात प्रभाव असलेल्या आणि प्रत्येक केंद्रीय मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री राहीलेल्या स्व.रामविलास पासवान यांच्या दुसऱ्या पत्नीच्या चिराग नावाच्या एका चित्रपटापुरता अभिनेता असलेल्या मुलाने मात्र भाजपपासून फारकत घेतली आहे. लोकजनशक्ती पक्ष १४३ जागांवर लढत असून त्यांचा मुख्य ध्येय नितीशकुमार यांच्या जागा कमी करण हे असल्याच सकृतदर्शनी दिसत. आणि त्यामुळेच त्यांच्या आणि भाजपच्या हेतूबद्दल शंका उत्पन्न होते. मोदी नेहमीप्रमाणे चिरागचा फायदा आपल्या राजकीय स्वार्थासाठी करून नंतर त्याला फेकून देण्याची शक्यता नाकारता येत नाही. पासवान यांचं नितीशकुमार आणि लालूप्रसाद या दोघांशीही सख्य नव्हतं. आज त्यांच्या जागेवर अजूनही लोकजनशक्ती या पक्षाच्या एकही मंत्र्याची वर्णी लागलेली नाही अथवा लागण्याची शक्यताहीनाही. पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला समोर भाजप नितीशकुमार यांच्या जागा कमी करून आपल्या वाढवून त्याद्वारे मुख्यमंत्री पदावर दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या ५३ जागांवर असलेल्या भाजपने आकड्यांच्या खेळत जद (यु) मागे टाकल्यास उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपचे सुशीलकुमार मोदी मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतात. आणि त्यावेळी पून्हा राजद , काँग्रेस आणि जद (यु) एकत्र येऊन भाजपला एकट पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि शिवसेना,अकाली दल यापाठोपाठ नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडल्यास ती राष्ट्रीय लोकशाही आघाडीची अखेर असेल!