खारघर वाहतूक पोलिसांची हलगर्जी : पोलिस आयुक्त गुन्हे दाखल करतील का…?
श्री कांतीलाल कडू यांनी सामान्य जनतेच्या मनातील व्यक्त केले मनोगत!!!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई : माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाताने महाराष्ट्राच्या काळजावर ओढले गेलेले चरे मराठा समाजाची मोठी हानी पोहचवण्यास कारणीभूत ठरले. अपघात, मृत्यूच्या घटनांची शृंखला हनुमंताच्या शेपटीसारखी वाढत जाणारी आहे. त्याचे उमटणारे पडसाद अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या सामाजिक, राजकीय स्थैर्यावरून कधी कधी ठरत असतात. मेटे यांच्या अपघातानंतर उठलेले संशयाचे वादळ पेल्यातील ठरले आहे. परंतु, कळीचा मुद्दा ठरला तो हा की, तिथे त्यांना ना रुग्णावाहिका वेळेवर उपलब्ध झाली, ना स्थानिक वाहतूक पोलिस किंवा राज्य महामार्ग पोलिसांचे पथक वेळेवर पोहचले. ती मदत मिळाली असती तर कदाचित मेटे यांचा जीव वाचलाही असता. असो, त्या षडयंत्राच्या मुळाशी न जाता यंत्रणा कशी म्हशीसारखी डबक्यात सुखलोळण घेत असते त्याचा आणखी एक पुरावा आज समोर आला आहे.
खारघर उड्डाण पुलावर पुणेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गीकेवर महाकाय ट्रेलरचा ब्रेक निकामी झाला. मोठ्या व्यासाचे पाइप घेवून जाणारा तो भलामोठा ट्रेलर त्याच गतीने पुलावरून मागे आला. मागून येणाऱ्या गाडीवर आदलला. दोन मोटारगाडीला धडक दिल्यानंतर मागून आलेल्या तिसऱ्या गाडीला, एर्टिगाला इतकी जबरदस्त धडक दिली की, ती गाडी जाग्यावर एका क्षणात भुईचक्रासारखी उलट्या दिशेने फिरली. त्यामुळे गाडीतील तीन चिमुकली, चालकाची पत्नी, वयोवृद्ध आई आणि चालकाला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचा भास होताना त्यांच्या हृदयाचे ठोके चुकले असतील. सुदैवाने चालक सोडून गाडीतील कुणीही जखमी झाले नाही. हा अपघात पाहिला तर प्रथमदर्शिनी कुणीही वाचले नसेल असे ते दृश्य होते. सकाळी 7.30 वाजता उगवत्या सूर्याच्या साक्षीनेच घडला. अपघातानंतर खारघर पोलिसांचे तीन कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. रात्री खारघरमधील तवा हॉटेल चालकाने पोलिसांना धक्काबुक्की केली. झटापट झाली. दीड वाजता ही घटना घडली. त्यात पोलिस मग्न होते. त्या हॉटेल चालकविरुद्ध सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्याला अपघात झाला. त्याच्या डोक्याला जबर दुखापत आहे. अशी ही अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची यंत्रणा रात्रभर व्यस्त असताना त्यांचे कर्मचारी वेळेवर अपघातास्थळी पोहचतात. अपघातग्रस्त चालकाला हॉस्पिटलला नेतात. ते वाहन बाजूला काढून त्यातील इतर सदस्यांना बाहेर काढून दुभाजकांवर बसवून धीर देतात. ते वाहन टो करून बाजूला काढतात. तरीही खारघर वाहतूक पोलिस झोपेचे सोंग घेवून तिकडे फिरकत नाहीत. हा अक्षम्य गुन्हा आहे. हलगर्जी आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत त्यांना कर्तव्याची जाणीव होत नसेल तर एक दिवशी नागरिकांचा उद्रेक होईल आणि अशी वाहतूक पोलिस यंत्रणा विसर्जित करतील.
वाहतूक पोलिसांना त्यांच्या कर्तव्याचे भान उरले नाही. त्यांचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड अगदीच कोडगे आहेत, असे मागील घटनांच्या मागोव्यावरून स्पष्ट होते. गेल्याच महिन्यात एका वाहनचालकाने वाहतूक हवालादाराला यमाचा दोर फेकला होता. त्यातून ते हवालदार केवळ नशिब बलवत्तर म्हणून वाचले. चालक आजही कारागृहात आहे. त्याने केलेल्या गुन्ह्याचे कुणीही समर्थन करणार नाही. आरोपीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शिवाय सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा वाहतूक पोलिसांना जन्मजात लाभलेला हक्कही त्यांनी बजावत आरोपीला सातवे अस्मान दाखविले. हे सगळे ठीक आहे. मग हक्क, अधिकारासोबत कर्तव्याचा नेमकी वेळेला यांना विसर कसा पडतो, हा प्रश्न आहे.
टेंडर भरल्याशिवाय पोलिसांची पोस्टिंग होत नाही. ही कीड सर्वच सरकारी खात्याला लागलेल्या कॅन्सरसारखी आहे. त्यामुळे पेरलेले खोके गोळा करण्यात सगळी यंत्रणा मरेस्तोवर घाण्याला जुम्पलेल्या बैलासारखी कामाला लागते आणि त्यांची ढुशी सर्वसामान्य माणसाला बसते.
वाहतूक नियंत्रण करताना चालकांच्या खिशाचे कधी कसे नियंत्रण हाती घेतात ते या वाहतूक पोलिसांनाच ठाऊक. जेवढे कडक कायदे तेवढा भ्रष्टाचाराला वाव मिळतो. सरकारी यंत्रणेतील ही भयानकता आहे. त्यामुळे जिथे फायदा नाही तिथे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, मग माणसं मेली तरी चालतील. एरव्ही पहाटेच्या धुक्यातूनही फळभाजीच्या गाड्या अडवून विरप्पन स्टाईलने दहशत माजवली जाते. रात्रीच्या गर्भात अवजड वाहने रोखली जातात. वसुली मोहीम जोमात असते आणि दिवसभर बिचारे दुचाकीस्वारांच्या खिशावर दरोडे घालण्याचा राखीव अधिकार वापरतात. मग अपघाताच्या वेळी त्यांचे कर्तव्य कुठे झक मारत असते हा खरा प्रश्न आहे, आणि म्हणून आज सकाळी खारघर वाहतूक पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी आदेश काढून दोषी वाहतूक कर्मचारी, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अन्यथा काळ सोकावेल.
नवी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. पण इथे सिंहाच्या अवलादीही आहेत. अतिझाल्यावर एक दिवस ते झडप टाकण्यास प्रवृत्त झाले तर त्याला कारणीभूत कामचुकार वाहतूक पोलिस ठरतील. त्यात खारघर पोलिस अग्रस्थानी असतील इतका नागरिकांचा उद्रेक दिसून येत आहे.