घरांवर ज्यांनी तिरंगा फडकवला त्यांना बेघर होऊ देणार नाही

0
750

घरांवर ज्यांनी तिरंगा फडकवला त्यांना बेघर होऊ देणार नाही

डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वेच्या प्रबंधकांना दिला इशारा

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

 

मुंबई – मुंब्रा येथील 22 इमारतींना रेल्वेने नोटीस बजावून त्या रिकाम्या करण्याचे सूचित केले आहे. मात्र, मुंब्राच काय, कल्याण, मुंबईतील एकाही नागरिकांना बेघर होऊ देणार नाही. यापुढे नोटीसच काय, सदर इमारतींच्या जवळपासही फिरकू देणार नाही; ज्या नागरिकांनी हर घर तिरंगा अभियानात सहभाग घेऊन आपल्या घरांवर तिरंगा फडकवला त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये बेघर होऊ देणार नाही, असा इशारा माजी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मध्य रेल्वेचे मंडल प्रबंधक सलभकुमार गोयल यांची भेट घेऊन दिला.

मुंब्रा रेल्वेस्थानक परिसरातील 22 इमारतींना रेल्वे प्रशासनामार्फत नोटीस पाठविण्यात आलेल्या आहेत. या इमारतींना अचानक नोटीसा बजावण्यात आल्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था व भीतीचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वेच्या मुख्यालयात जाऊन रेल्वे प्रबंधक सलभकुमार गोयल यांची भेट घेतली. या भेटीमध्ये रेल्वे प्रबंधकांनी आणखी नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावर डॉ. आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली.

डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रबंधक सलभकुमार गोयल यांना सांगितले की, मुंबईतील सुमारे 30 हजार झोपड्या आणि मुंब्रा ते कल्याण दरम्यानच्या शेकडो इमारती पाडण्याचे धोरण रेल्वेचे असले तरी आता 40 वर्षानंतर कोणालाही बेघर करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही. केंद्र सरकारने माणुसकीची कास धरुन नागरिकांना बेघर करु नये. तसा प्रयत्न झाला तर इमारतींच्या आसपासही रेल्वेच्या प्रशासनाला फिरकू देणार नाही. फारफार तर गोरगरीबांवर गोळीबार कराल; पण, त्यापेक्षा अधिक काही आपण करणार नाहीत; त्यामुळे या नोटीसा रद्द कराव्यात, अशी मागणीही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्यावर रेल्वे प्रबंधकांनी याबाबत वरिष्ठांना कळविण्यात येणार असून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

 

 

दिवाळीपर्यंत मुंब्रा रेल्वेस्थानकातील सरकते जिने सुरु होणार

मुंब्रा रेल्वे स्थानकामध्ये सरकते जिने बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. हे काम थांबले असल्याचे डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रबंधकांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर सदरच्या कामाला न्यायालयीन स्थगिती असल्याचे प्रबंधकांनी सांगितल्यानंतर न्यायालयीन तिढा संपला असल्याची बाब डॉ. आव्हाड यांनी स्पष्ट केली. त्यानंतर सदरचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असून येत्या दिवाळीपर्यंत मुंब्रा रेल्वे स्थानकातील सरकते जिने कार्यान्वित होतील, असे रेल्वे प्रबंधक सलभकुमार गोयल यांनी डॉ. आव्हाड यांना सांगितले.

 

 

रेतीबंदर पुलाच्या कामाला गती येणार

रेतीबंदर येथे पादचारी पुलाचे काम थांबले असल्याने रेल्वे अपघातात अनेकांचे मृत्यू होत आहेत, हे काम तत्काळ सुरु करावे, अशी मागणी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. या मागणीनंतर रेल्वे प्रबंधकांनी, सदर ठिकाणी होणार्‍या अपघातांची माहिती आम्हाला आहे. काही काळापूर्वी रेतीबंदर येथील रेल्वे पादचारी पुलाचे काम सुरु झाले होते. मात्र, काही कारणास्तव ते बंद झाले होते. मात्र, आता हे काम सुरु करण्यात येणार असून लवकरच हा पादचारी पुल उभारुन नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याचेही रेल्वे प्रबंधकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here