हर घर तिरंगा
सन्माननीय केंद्रीय मोदी सरकार यांना खुले पत्र
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
सन्माननीय केंद्रीय मोदी सरकार नमस्कार.
आपण देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहात, त्याबद्दल आपणास मनःपूर्वक खुप शुभेच्छा.
एक भारतीय नागरिक म्हणून मला असे वाटते की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या नावाखाली आज पुन्हा एकदा मन की बात सारखी बळजबरी आपण देशवासियांवर लादू पहात आहात.
हर घर तिरंगा या मोहिमेद्वारे घरावर तिरंगा फडकावून देशवासियांना देशप्रेम व्यक्त करायला लावणारा किंवा सिद्ध करायला लावणारा हा प्रकार फक्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी देखावा ठरू नये, तर तो देशाप्रती अंतःकरणातून व्यक्त होणारा खरा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ठरावा,असे मला वाटतेय.
कारण मागील आठ वर्षांपासून आपण केंद्रीय सरकारात आहात आणि असे अनेक प्रयोग- बळजबऱ्या आपण
भारतीय नागरिकांवर लादल्या आहेत. नुकतीच कोरोना काळातील टाळ्या – थाळ्या वाजविण्याची बळजबरी लोक अजूनही विसरलेले नाहीत.
रात्री नऊ वाजता दिवे पेटवण्याची बळजबरी लोक विसरलेले नाहीत.
म्हणजे आपण देशवासियांवर लादलेल्या या सर्व बळजबऱ्या खऱ्या, वास्तववादी नव्हत्या तसेच कोरोना या महामारीवर उपचार किंवा औषधी म्हणून ही उपयोगाच्या नव्हत्या, हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. देशासाठी त्या किती बनावट आणि फसव्या होत्या, हे लोक विसरलेले नाहीत. कारण एवढे सगळे करूनही देशात कोरोना मृत्यूने थैमान घातलेच आहे. असो.
हर घर तिरंगा ही एक मोहीम आपण देशभर राबवित आहात, पण कशासाठी? यामागे देशासोबत “बदला” घेण्याचा विचार आहे की “बदल” घडवण्याचा?
आणि मग तो बदल कोणता? याबद्दल आपण देशासमोर बोलले पाहीजे.
हर घर तिरंगा ही मोहीम आपण राबवत आहात,
तर मग याच धर्तीवर हर घर संविधान ही मोहीम आपण देशभर का राबवत नाहीत? असा प्रश्न देखील माझ्या मनात निर्माण झाला आहे.
तिरंगा तर प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनामनात वसलेला आहेच. हे निर्विवाद सत्य ही आहे. अशा सत्याला सिद्ध करण्याची आवश्यकता नसते कारण ते ढळढळीत सत्य असते म्हणून. आज देशात प्रश्न आहे तो देशभर हर घर शिक्षण देण्याचा.
प्रश्न आहे तो देशभर हर घर नोकरी देण्याचा.
प्रश्न आहे तो देशभर हर घर उत्तम आरोग्य देण्याचा.
प्रश्न आहे तो देशभर हर घर अन्नधान्य पुरविण्याचा.
प्रश्न आहे तो देशभर बेघरांना घरे देण्याचा.
ही मोहीम आपण देशात केंव्हा राबवणार आहात?
हे ही आपण देशाला सांगितले पाहीजे,असे मला वाटते.
सन्माननीय केंद्रीय मोदी सरकार,
देश-विदेशातील अनेक शासकीय संस्थांचे अहवाल खुप बोलके आहेत. ते असे सांगतात की,
1) भारत देशात चाळीस कोटी च्या वर लोकं निरक्षर आहेत.
2) देशभरात पन्नास लाख लोकं फूटपाथवर (बसस्टॅड, रेल्वेस्थानक, रस्त्यावर ई.) ठिकाणी राहतात.
3) देशात दोन कोटी लोकं अनाथ आहेत.
4) देशात पाच कोटी नव्वद लाख महिला विधवा आहेत.
5 ) देशातील चाळीस कोटी लोकं दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत.
6) देशात तिस कोटी लोकं रात्री उपाशीपोटी झोपतात.
7) देशातील कुपोषित माता – बालकांची संख्या,मृत्यूची संख्या लाखाहून कोटीच्या घरात चालली आहे.
8) देशातील तब्बल चौऱ्यांन्नव टक्के लोक असंघटित क्षेत्रात येतात. त्यांचे सर्वांगीण जीवन जगणे खुप भयावह आहे.
9) देशात स्वतःवर दररोज
केवळ नऊ रूपये,अकरा, पंधरा आणि विस रूपये एवढाच खर्च करणाऱ्यांची संख्या चाळीस टक्क्यांच्यावर वाढत आहे.
10) देशातील साठ टक्के घरं ही कच्ची घरे आहेत.
11) देशातील सत्तर टक्क्यांवरील लोकांचे जेवण हे आजही चूल, शेगडीवर बनतेय.
12) देशातील पस्तीस टक्के लोकांची घरं म्हणजे एकाच रूममधे किचन, बैठक, बेड, बाथरूम ई.
13) देशातील साठ टक्के घरात आजही वर्तमानपत्रे पोहचत नाहीत.
14 ) देशातील शेकडो हजारो गावापर्यंत अजूनही वीज पोहचलेली नाही.
15) देशातील शेकडो हजारो गावांसाठी रस्ते नाहीत.नद्या- नाले- ओढ्यांवर पुल नाहीत.
16 ) देशातील शाळांची, रूग्णालयांची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
17) देशातील गरिबांची संख्या रोज वाढत चालली आहे, तर मुठभर अधिक श्रीमंत बनत आहेत.
अशा इतर ही अनेक सत्य बाबींवर प्रकाश टाकता येईल एवढी देशाची वाईट सद्दस्थिती आहे. यावर आपले सरकार ब्र शब्द ही बोलत नाही. केवळ हर घर तिरंगा मोहीम राबवून काय साध्य करणार आहात ? यावर सरकार म्हणून आपण देशासमोर बोलले पाहीजे. देशाच्या या सत्य, वास्तव परिस्थितीवर मात करण्यासाठी निश्चितपणे तातडीने काही ठोस उपाय योजना केल्या पाहिजेत, असे मला वाटते.
सन्माननीय केंद्रीय मोदी सरकार,
15 ऑगस्ट 1947 नंतर ज्यांनी कधीच अंतःकरणातून भारतीय तिरंगा ध्वजाचा सन्मान केला नाही, मान दिला नाही, मानवंदना दिली नाही,आदर केला नाही, कदर केली नाही,त्याला देशाचा मानले नाही,पण वेळोवेळी दिखावा मात्र केला,अशा लोकांकडून आज हर घर तिरंगा अशी बळजबरी होत आहे,याचे तमाम भारतवासियांना आश्चर्यच वाटत नाही,तर संताप पण येत आहे. कारण भारत देशाचे जे जे म्हणून बोध चिन्हं, स्तंभ, तिरंगा झेंडा, राष्ट्रगीत, राष्ट्रीयपशू,राष्ट्रीयपक्षी ई.राष्ट्रीय संपत्ती-प्रतिकं आहेत, ती तमाम भारतवासियांचीच तर आहेत.अशा सर्व राष्ट्रीय प्रतिकांवर प्रत्येक भारतीयांचे प्रेम हे आहेच. सर्वांना त्यांचा आभिमान आहेच. मग आणखी कोणती देशभक्ती, आणखी कोणते देशप्रेम आपणास भारतीयांकडून अभिप्रेत आहे?आणि कशासाठी? देशवासियांची ही कोणती परिक्षा आपण घेत आहात? देशवासियांची अशी परिक्षा घेणारे आपण काही परकिय नाहीत. मग हर घर तिरंगा फडकावून ते सिद्ध करण्याची गरज ती आपणास का वाटावी ?
आपले सरकार म्हणजे या देशातील काही परकीय सरकार नाही,जे आम्हा भारतवासियांना आमचे देशप्रेम सिद्ध करायला लावतेय! मग अशाप्रकारे लोकांची भावनिक उष्णता वाढीस लावण्यामागे प्रयोजन ते काय?
या बाबी सविस्तर पणे आपण देशाला सांगितल्या पाहीजेत, असे मला वाटते.
देशातील वर नमूद सत्य आणि सद्द परिस्थिती लक्षात घेता, आपल्या सरकारची ही तालीबानी बळजबरी कशासाठी? देशात लोकांना एक वेळेचे अन्न कमवून खाण्याची भ्रांत असताना, शंभर- दिडशे रूपयांचा झेंडा विकत घेऊन घरावर लावा, ही हुकूमशाही बळजबरी कशासाठी? याचा भारतीय नागरिक म्हणून मला उलगडा होत नाही, तो कृपया आपण देशासमोर करावा.
सन्माननीय केंद्रीय मोदी सरकार,
जे लोकं,संस्था,संघटना,पक्ष ई.भारतीय तिरंगा ध्वजाला मानत नाहीत आणि इतर रंगाच्या झेंड्याला मानतात अशा लोकांच्या अंतरंगातील सत्याला आणि वरवरच्या देशप्रेमी देखाव्याला आपण कोणत्या फूटपट्टीने आणि कसे नापणार आहात? म्हणून मला असे वाटते की, आपण या देशातील सर्व बेरोजगारांना नोकऱ्या देऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा.
आपण या देशातील केजी ते पीजी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सक्तीचे आणि मोफत संविधानिक शिक्षण देऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा.
आपण या देशातील प्रत्येकाचं आयुष्य निरोगी आणि दीर्घायुष्यी बनवण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा.
आपण या देशातील रोजच्या वाढत्या जीवघेण्या महागाईला लगाम घालून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा.
सरकार म्हणून तुम्ही आणि शत्रू म्हणून आम्ही हा भेद आधी मनातून घालवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा.
या देशातील एकता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्ष भाव अबाधित ठेवण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा.
या देशातील प्रत्येक भारतीयाला सर्वांगीण स्वातंत्र्य, न्याय, हक्क, आधिकार मिळण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा.
देशात जात,धर्म,पंथ ई.भेद होणार नाहीत. सर्वजण गुण्यागोविंदाने राहतील यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा.
सरकार म्हणून आपल्याला जर एवढेच देशप्रेम गाजवायचे आहे, तर मग सरकार म्हणून आपण हर घर तिरंगा वितरीत करावा. तो विकत घेऊन घरावर लावा, असा हेका कशासाठी? हर घर तिरंगा या मोहिमेच्या नावाखाली भारतीयांची देशभक्ती कोणाच्या नफ्यासाठी? कोणाच्या फायद्यासाठी?
यावर सुद्दा आपण सरकार म्हणून देशासमोर बोलले पाहीजे.वर नमूद देशाच्या सत्य आणि सद्द परिस्थितीवर आपण बोलावे आणि तातडीने युद्ध पातळीवर उपाय योजना आखाव्यात आणि खऱ्या अर्थाने या देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा, असे एक भारतीय नागरिक म्हणून मला वाटतेय, म्हणून हा पत्र प्रपंच.
ॲड. सुभाष सावंगीकर, औरंगाबाद यांनी आपले मनोगत व्यकत केले आहे.