घुग्घुस भाजपतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित भव्य तिरंगा रॅली
स्वातंत्र्य, समता आणि सर्वधर्मसमभावाचा विचार चिरंतन ठेवण्याचा दृढनिर्धार करून प्रत्येकानी अमृत महोत्सवी अभियानात सहभागी व्हावे – जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
पंकज रामटेके /विशेष प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहराच्या वतीने गुरुवार, दि. ११ ऑगस्ट रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्यानं शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्यानं देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी देशवासियांना केलेल्या आवाहनाप्रमाणे संपूर्ण देशात “हर घर तिरंगा अभियान” मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे.
या देशव्यापी अभियानात घुग्घुस शहरातील नागरिकांना सहभागी करून घेत प्रत्येकांनी यंदाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे आनंद द्विगुणित करावे यासोबतच घुग्घुस वासीयांमध्ये देशभक्तीसह देशाभिमानाची भावना वाढीस लागावी या उदात्त हेतूने घुग्घुस भाजपने शहरातील देशभक्त नागरिकांना भव्य मोटारसायकल तिरंगा रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले.
त्यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिकांनी आपापल्या मोटरसायकलवर तिरंगा ध्वज लावून भारतमातेच्या उत्स्फूर्त जयघोषात ही रॅली काढली.
स्थानिक आठवडी बाजारातून निघालेल्या या रॅलीचे तिलक नगर, अमराई वार्ड, गांधीचौक, जुना बसस्थानक, नवीन बसस्थानक चौक, राजीव रतन चौक, इंदिरानगर, रामनगर, केमिकल वार्ड मार्गाने आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रासमोर समारोप करण्यात आले.
रॅली दरम्यान, नागरीकांनी केलेल्या भारत माता की जय तसेच वंदे मातरम् च्या जयघोषाने संपुर्ण घुग्घुस शहर दुमदुमून गेले.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की, येत्या १५ ऑगस्ट रोजी देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. आपला भारत अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. शेकडो ज्ञात-अज्ञात स्वातंत्र सेनानी, क्रांतिकारक आणि हुतात्म्यांच्या बलिदानामुळे भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी पारतंत्र्यातून मुक्तता मिळाली.
यंदा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करीत असताना त्या ऐतिहासिक स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं हेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील वीरांना खरे अभिवादन ठरेल. आपला देश आज स्वतंत्र, सार्वभौम असून आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत, याचं श्रेय आपल्या पूर्वजांनी इंग्रजांविरुद्ध दिलेल्या लढ्याला आहे. त्यांच्या त्यागाचं स्मरण ठेवून देशाचं स्वातंत्र्य, समता, अखंडता, सार्वभौमता आणि सर्वधर्मसमभावाचा विचार चिरंतन ठेवण्याचा दृढनिर्धार करण्याच्या उद्देशाने राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून हा अमृत महोत्सवी वर्ष साजरा केला जाणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाभर शासन प्रशासनासह भाजपच्या वतीने भव्य तिरंगा रॅली, घरोघरी तिरंगा, भव्य तिरंगा रांगोळी, देशभक्तिपर कार्यक्रम इ. अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत.
पुढे बोलताना, यासोबतच जिल्ह्यातील सर्व जनतेस माझे आवाहन आहे, की येत्या १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता प्रत्येकानी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावे आणि १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सन्मानाने ते ध्वज उतरवावे. असेही ते म्हणाले.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, पोलीस निरीक्षक बबन पुसाटे, निरीक्षण तांड्रा, संजय तिवारी, संतोष नुने,सिनू इसारप, साजन गोहने, विनोद चौधरी, हसन शेख, गुड्डू तिवारी, शरद गेडाम, बबलू सातपुते, अजय आमटे,राजेश मोरपाका, प्रवीण सोदारी, हेमंत पाझारे, अनवर खान, आजम खान, सचिन कोंडावार, हेमराज बोंबले,रत्नेश सिंग अश्विनी सिंग, नितीन काळे, मानस सिंग,मल्लेश बल्ला, धनराज पारखी, तुलसीदास ढवस, शाम आगदारी, असगर खान, विक्की सारसर, मधुकर धांडे, दिनेश बांगडे,सुनील राम, सुरेंद्र जोगी, सिनू कोत्तूर, भानुदास गंगाधरे, पंकज सिंग, कोमल ठाकरे, अंजु इरगुराला,सिनू बुद्धार्थी यांचेसह मोठ्या संख्येने स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पार पडलेल्या या भव्य तिरंगा रॅलीचे संयोजक म्हणून भाजयुमोचे अमोल थेरे व विनोद जंजर्ला यांनी जबाबदारी पार पाडली.