संतापजनक घटना! आश्रमशाळेच्या अधीक्षकाचा 13 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेल्या एका आश्रमशाळेच्या अधीक्षकाने 13 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
खाजगी आश्रमशाळेच्या अधीक्षकाने 8 व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याने जिल्ह्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. पीडित मुलीचं कुटुंबं हे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील असून रोजगारासाठी हिंगणघाट येथे गेलं होतं.
पीडित मुलीला या आश्रमशाळेत शिकायला दाखल केलं होतं. मात्र मुलीची प्रकृती बिघडल्याचं कारण सांगत मुलीला परत नेण्यात यावं असं शाळेकडून सांगण्यात आल्यावर पालकांनी तिला परत नेलं. मात्र पालकांनी परत घरी नेल्यावर विद्यार्थिनीने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला.
पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल करताच हिंगणघाट पोलिसांनी आरोपी अधीक्षक संजय इटनकर याला ताब्यात घेतले. त्यानंतर भद्रावती पोलिसांना हे प्रकरण हस्तांतरित कऱण्यात आले आहे. आयपीएस अधिकारी आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक तयार करून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.
या आश्रमशाळेत 360 मुलं असून यापैकी 120 या मुली आहेत. त्यामुळे या शाळेतील आणखी काही मुलींवर अशा प्रकारचा अत्याचार झालाय का याबाबत पोलीस आणि समाजकल्याण विभाग तपास करत आहेत. आम्ही घटनास्थळाला भेट दिली आहे. आम्ही आरोपीची देखील चौकशी करत आहोत. या प्रकरणात आणखी मुलींवर अत्याचार झाला आहे का? याबाबत देखील पोलिस चौकशी करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
भंडाऱ्यातील 35 वर्षीय महिलेवरील अत्याचार प्रकरण ताजे असताना आता चंद्रपूरमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचाराचं हे प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणानंतर लोकांमध्ये संतापाची भावना असून संबंधित आरोपीला कडक शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे.