ध्येयवेड्या सर्पमित्रांचे शेकडो सापांना जीवनदान
नेफडो च्या वन्यजीव संवर्धन समितीचे उल्लेखनीय कार्य
मानव-सर्प संघर्ष टाळण्याकरिता हे सर्पमित्र करताय जीवाचे रान
राजुरा, 1 ऑगस्ट
साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर शहारे येतात व सापांविषयी असलेल्या अज्ञानामुळे अनेक लोक सापाला मारतात. मानव -सर्प संघर्ष टाळण्याकरिता राजुरा येथील सर्पमित्र सरसावले असून जीवनदीप सर्पमित्र व पर्यावरण संस्था राजुरा येथील अनेक सदस्यांनी आता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वन्यजीव संवर्धन समितीच्या माध्यमातून उल्लेखनिय कार्य करीत शेकडो सापांना जीवनदान देत त्यांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे.
सर्पमित्र विजय पचारे, अमर पचारे, मनोज कोल्हापुरे हे स्वतः चे कामे सांभाळून एका भ्रमणध्वनीवर माहिती मिळताच साप पकडायला जातात. यात त्यांना वन्यजीव संवर्धन समितीचे जिल्हा अध्यक्ष संदीप आदे व रतन पचारे यांचे मार्गदर्शन मिळते. बऱ्याच वर्षापासून या सर्पमित्रांचे अधिकृतपणे साप पकडून त्यांची वनविभाग कार्यालय येथे रीतसर नोंदणी करून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिल्या जाते. नुकत्याचं सुरु झालेल्या पावसाळ्यात 29 साप बिनविषारी, 15 साप विषारी, एक साप दुर्मिळ प्रजातीचा निमविषारी मांजऱ्या (कॉमन कॅट स्नेक ), एक साप दुर्मिळ प्रजातीचा बिनविषारी अजगर (इंडियन रॉक प्याथन ) असे एकूण 46 साप पकडून त्यांना जीवनदान दिले आहे.
बिनविषारी सापांमध्ये धामण, रुक्कई, पाणदिवट, नानेटी, धुळीनागीन, कवड्या, डूरक्या घोणस आदी सापांचा समावेश आहे. तर विषारी सापांनमध्ये नाग, मन्यार, घोणस चा समावेश आहे. मागील जानेवारी महिन्यापासून अत्यंत दुर्मिळ असलेले गवत्या (ग्रीन ग्रास स्नेक ), हरणटोक (वाईन स्नेक ) व गजऱ्या (स्मोथ स्नेक ) यांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे. हे सर्व करीत असताना आजपर्यंत शेकडो सापांची नोंद या सर्पमित्रानी वनविभागाच्या कार्यालयात केली आहे. या नोंदी करताना सापाचे नाव, कुठे पकडला तेथील पत्ता, सापाचा वर्ग – विषारी, बिनविषारी, निमविषारी , गट -साधारण, दुर्मिळ, वजन, लांबी, साप पकडणाऱ्या सर्पमित्रांचे नाव, दिनांक, वेळ अश्या प्रकारे रितसर सर्व माहिती देऊन हे सर्पमित्र सापानां पकडून त्यांना जीवनदान देतात. परंतु अलीकडे अनेक युवक केवळ प्रसिद्धी आणी स्टंट व देखावा करण्याच्या नादात कुठलेही अधिकृत प्रशिक्षण न घेता, सापांची ओळख नसतानाही सापाला पकडतात व सापा सोबतचे फोटो सोशल मीडियावर टाकून आपली पाठ थोपटून घेतात. परंतु त्यांच्या या जीवघेण्या विकृतीमुळे साप व स्वतः चा जीव धोक्यात घालतात. त्यामुळे अश्या अज्ञानी, अप्रशिक्षित, सापांच्या जीवाशी खेळनाऱ्या, वनविभागात नोंद न करणाऱ्या स्वयं घोषित सर्प मित्रांवर कठोर कार्यवाही होणे गरजेचे आहे आणी या संदर्भात बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नेफडो यांनी वनविभागाकडे लेखी तक्रार सुद्धा केली आहे. त्यामुळे मानव -सर्प संघर्ष टाळण्याकरिता आपल्या प्राणाची पर्वा न करता प्रशिक्षित व सापांचे पुरेपूर ज्ञान असलेल्या या सर्पमित्राना वन विभागाने वन्यजीव संवर्धन समितीचे अधिकृत सर्पमित्र म्हणून घोषित करून त्यांना वैद्यकीय सेवा, मानधन, व साप पकडण्याचे अद्यावत साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नागपंचमी च्या निमित्याने बादल बेले यांनी वनविभागाकडे केली आहे.
जीवनदीप सर्पमित्र व पर्यावरण संस्थेच्या प्रशिक्षित सदस्यांनी नेफडो च्या वन्यजीव संवर्धन समितीचे सभासद होऊन मानव -सर्प संघर्ष टाळण्याचे आदर्श कार्य हाती घेतले आहे त्यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. केवळ साप च नाही तर अन्य वन्य प्राणी, पक्षी यांनाही हे सर्पमित्र रेस्क्यू करतात व त्यांच्यावर योग्य वैद्यकीय उपचार करून त्यांनाही जीवनदान देतात हे विशेष.