राजू खेडेकर मित्र परिवारातर्फे शासकीय रुग्णालयात वृक्षारोपण
नैतिक मूल्यांची जोपासना करत वृक्षाचे संवर्धन करा- प्रकाश बोरकर
नांदा फाटा/प्रतिनिधी : मौजा नांदा येथील नवनिर्मित शासकीय रुग्णाल याचे नुकतेच उद्घाटन झाले असून या ठिकाणी विविध आजारावर ती उपचार आणि औषधोपचार केले जात आहे. शिवाय नवीन वास्तू असल्यामुळे संपूर्ण परिसर ओसाड स्वरूपाचा दिसून येत होता. याचीच दखल घेत नांदा येथील प्रतिष्ठित उपक्रमशील व सामाजिक उत्तरदायित्व निभावणारे नवयुवक राजू खेडेकर व मित्रपरिवार यांनी स्वखर्चाने विविध प्रजातीचे शेकडोंच्या संख्येत रोपटे आणून संपूर्ण रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांच्या मित्र परिवार पैकी प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
त्यांनी आपल्या अनुभवानुसार मानव जसा नैतिक मूल्यांची जोपासना करतो. त्याचप्रमाणे आपण वृक्षांचे संवर्धन करायला पाहिजे असा संदेश देत पाच वृक्षांच्या संवर्धनाचं पालकत्व त्यांनी स्वीकारल. सदर कार्यक्रमाला परिसरातील पत्रकार रत्नाकर चटप, रवी बंडिवार, प्रमोद वाघाडे, वरिष्ठ नागरिक प्रभाकर कुरसंगे, विनोद इटनकर, गौरव बंडीवार, आकाश बोंगीरवार, प्रफुल श्रीरामवार, निवासी वैद्यकीय अधिकारी विजय हिवरकर, मोठ्या संख्येत गावकरी वर्ग उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय अधिकारी हिवरकर यांनी शासकीय रुग्णालयाच्या परिसरात खुली व्यायाम शाळा साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत उपस्थित पत्रकारांच्या माध्यमातून वृत्त पत्राद्वारे शासनापर्यंत हाक पोचवली जावी अशी मागणी केली. शिवाय रुग्णालयाला लागून असलेली स्मशानभूमी इतरत्र स्थानांतरित करण्यात यावी. याविषयी स्थानिक प्रशासनाने पाठपुरावा करावा अशी मागणी केली.
भविष्यात येणाऱ्या काळात नांदा ग्रामीण रुग्णालय ही फार मोठी उपलब्धी परिसरातील नागरिकांसाठी होणार आहे. असे भाकीत व्यक्त केले सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येऊन सर्वांना संवर्धनाची शपथ देण्यात आली.