महिला तलाठी एसीबी च्या जाळ्यात, तालुक्यातील दुसरी घटना
राजुरा, 25 जुलै : एक आदर्श तलाठी एसीबी प्रकरणातून तुरुंगातून बाहेर येतो न येतोच, दुसरा पुन्हा एसीबी च्या सापळ्यात अडकला आहे. यामुळे राजुरा तहसील कार्यालयांतर्गत येणारे तलाठी सह एकंदरीत महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आणखी तीन ये चार तलाठी ACB च्या रडारवर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तालुक्यातील चार ते पाच दिवसाअगोदर तलाठी साजा वरूर रोड येथील तलाठ्यास एसीबीने ताब्यात घेतले होते. आज पुन्हा एसीबीने सास्ती येथील महिला तलाठ्यास ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार संबंधित महिला तलाठीस 20 हजार रुपयाची मागणी केल्याच्या ऑडिओ क्लिप (call recording) च्या आधारे कारवाई करत आज सायंकाळी 4 वाजेच्या आसपास ताब्यात घेतले असून राजुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
सविस्तर वृत्त असे की, राजुरा येथील रहिवासी असलेले तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार लाच मागणी कारवाई करत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तहसील कार्यालय राजुरा अंतर्गत तलाठी साझा क्र. 4 सास्ती येथे कार्यरत तलाठी दिपाली परमानंद भडके (33) यांना तडजोडीअंती 20 हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.
तक्रारदार यांनी मौजा सास्ती शेतशिवारात शेती घेतली असून सदर शेतीचे फेरफार करून सातबारा नावावर होनेकरिता तक्रारदार यांनी तलाठी कार्यालय सास्ती येथे अर्ज दिला असता तलाठी यांनी शेतीचे फेरफार करून देण्याच्या कामाकरीता तक्रारदार यांना लाचेची मागणी करून पडताळणी दरम्यान तडजोडीअंती तलाठी यांनी तक्रारदार यांचेकडे 20 हजार रूपये लाचेची मागणी केली म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ला.प्र.वि. नागपूर चे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते, ला.प्र.वि. चंद्रपूर चे पोलीस उप अधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पो.नि. जितेंद्र गुरनुले, नापोशि संदेश वाघमारे, पो.शि. रोशन चांदेकर, रवी ढेंगळे, राकेश जांभूळकर, म.पो.शि. पुष्पा काचोळे, चालक पो.शि. सतिश सिडाम, ला.प्र.वि. चंद्रपूर पथकाने कारवाई केली.