गडचांदूर परिसरात बोगस डॉक्टरांचे “अच्छे दिन”
नोंदणी कृत डॉक्टरांपेक्षा कमाईत अग्रेसर
रुग्णांच्या जीविताशी खेळ सुरू
गडचांदूर-औद्योगिक शहर असलेल्या गडचांदूर परिसरामध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू असून याकडे प्रशासनाचे दूर्लक्ष होत आहे. आजच्या परिस्थितीमध्ये बोगस डॉक्टरांनी ठिकाणी-ठिकाणी दवाखाने उघडून रुग्णांवर सर्रासपणे उपचार करीत आहे व त्या रुग्णांवर वेगवेगळ्या तपासणी करायला लावून हजारो-लाखो रुपयांची लुबाडणूक करीत आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांचे अच्छे दिन आलेले आहे असेच म्हणावे लागेल.
गडचांदूर, कोरपना, जिवती या भागात जवळपास 60 ते 70 बोगस डॉक्टर सर्रासपणे नागरिकांची तपासणी करीत असतात. या डॉक्टरांना कोणाचेही भय नसून संपूर्ण हे अभय झालेले आहे. त्यामुळे नोंदणीकृत डॉक्टरांवर अन्याय होत आहे. याकरिता नोंदणीकृत डॉक्टरांनी संबंधित विभागाला निवेदनाद्वारे माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा अजूनपर्यंत बोगस डॉक्टरांवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
प्रत्येक जिल्हा स्तरावर बोगस डॉक्टरांवर देखरेख करून कारवाई करण्यासाठी कमिटी बनवलेली आहे तसेच तालुका स्तरावर सुद्धा कमिटी असते. परंतु या कमिटीचे बोगस डॉक्टरांवर दुर्लक्ष होत आहे. काही बोगस डॉक्टर तर नोंदणीकृत डॉक्टरांना बोगस असल्याचे सिद्ध करण्यासाठी तयार असतात. अशा बोगस डॉक्टरांमुळे रुग्णांच्या जीवाला बरेवाईट झाल्यास जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण होत आहे. त्याकरता प्रशासनाने तात्काळ कारवाई करून अवैद्य सुरू असलेल्या बोगस डॉक्टर व त्यांच्या दवाखाना वर कारवाई करावी अन्यथा प्रशासना विरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा नोंदणीकृत डॉक्टर असोसिएशनने केला आहे.