अनामत रक्कम न घेता नळ कनेक्शन मोफत करा
१५०० रुपयेच्या वसुलीसाठी नळ कनेक्शन कट
गडचांदुर : नांदा येथील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ जल उपलब्ध होण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जलस्वराज्य कडून पाणीपुरवठा योजनेचे काम १८ महिन्यापूर्वी पूर्ण झाले. ट्रायलमध्ये १५०० कुटुंबांना वर्षभर मोफत पाणी पुरवठा केला गेला. जुलै २०२१ मध्ये पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आली. नांदा ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी प्रत्येक नळजोडणी मागे १५०० रूपये डिमांड व प्रतिमहिना भाडे १५० रुपये शुल्क आकारण्याचे ठरविले. आता वसुलीचा तगादा सुरु केल्याने अनेकांनी पैसे भरले नसल्याने जवळपास ३०० कुटूंबाचे नळ कनेक्शन कट करुन पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने महीलांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे मोठ्या शहरांमध्ये मोफत पाणी पुरवठा केला जात असतांना नांदा ग्रामपंचायतीकडून नळ कनेक्शन करिता १५०० रुपये अनामत रक्कम प्रती महीना १५० रुपये शुल्क लावण्यात आले आहे. गोरगरीब मजुर वर्गातील अनेक कुटूंब मोठ्याप्रमाणात लावण्यात आलेल्या कराचा भरणा करु शकत नाही. नळ कनेक्शनची अनामत रक्कम न घेता मोफत नळ कनेक्शन देऊन प्रती महीना शुल्क १५० वरुन ७५ रुपये करण्याची मागणी नागरिकांनी नांदा ग्रामपंचायतीकडे केली आहे. यापुर्वीही नांदाफाटा येथील सांस्कृतिक भवनाचे भाडे ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी मासिक सभेत ठराव करून ५ हजार रुपये केले होते. सांस्कृतिक भवनाचे भाड्याचा मुद्दा विरोधकांनी आमसभेत लावून धरला भाडे २ हजार करुन नागरिकांना मोठा दिलासा दिला. ग्रामपंचायतीने अनामत शुल्क माफ करून प्रति महिना भाडे ७५ रुपये न केल्यास याविरोधात मोठे आंदोलन करण्याचा इशारा अरविंद इंगोले यांनी दिला आहे.
आमसभेतही झाला गदारोळ : नळ कनेक्शनच्या अनामत रक्कमेवरुन वरुन आमसभेत चांगलाच गदारोळ झाला. नागरिकांनी अनामत रक्कम माफ करण्याची मागणी केली परंतु माजी उपसरपंचाने याला विरोध केला. योजनेचा खर्च कसा चालणार असा उलट प्रश्न नागरिकांना केला. अल्ट्राटेक कंपनीकडून मिळणारा एकावर्षाचा कर जवळपास १५ लाख रुपये पाणीपुरवठा योजनेकरिता वळते करुन फिक्स डिपॉझिट केल्यास मिळणाऱ्या व्याजावर पाणीपुरवठा योजना सुरळीत चालु शकते.