शेकडो ट्रकांच्या लांबच लांब रांगा; पंधरा दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन

0
719

धुळीला त्रासून रामपूरची जनता रस्त्यावर

शेकडो ट्रकांच्या लांबच लांब रांगा; पंधरा दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन

राजुरा : मागील अनेक महिन्यापासून रस्ता बांधकामाच्या नावावर रामपूर येथील जनतेला धुळीचा सामना करीत आहे, मात्र खूप दिवस होऊनही रस्त्याचे बांधकाम सुरू न झाल्याने अखेर धुळीने त्रस्त रामपूरवासीय जनता आज (दि. २९) रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करीत या मार्गावरील कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रका चार तास अडवून रस्ता बांधकाम करणे व दिवसातून तीनवेळा रस्त्यावर पाणी मारण्याची मागणी करीत सास्ती टी-पॉईंट रामपूर येथे सकाळी दहा वाजता आंदोलनाला बसले.

रामपूर – गोवरी – कवठाला या मुख्य मार्गाचे काम मागील काही महिन्यांपूर्वी चालू केले परंतु अर्धवट काम करून आता सहा ते सात महिन्यापासून काम बंद असून या बाबत बांधकाम विभागाला बऱ्याचदा विचारणा केली असता लवकरच काम सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे, मात्र अजूनपर्यंत काम सुरू न केल्याने रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असून धुळीचे लोंढे उडत असल्याने रामपूर वस्तीतील नागरिकांचे जगणे कठीण झाले असून घरात सर्वत्र धूळ पसरलेली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम पडत असून पर्यावरणावर याचा परिणाम पडत आहे. सोबत परिसरातील शेत पिकांवर सुद्धा याचा मोठा परिणाम होत असून आर्थिक नुकसान होत आहे, अश्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्रातदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

या मार्गावरून गोयगाव, गोवरी, पोवणी, साखरी वेकोली कोळसा खाणीतून दररोज पाचशे वाहनांनी हजारो टन कोळश्याची उचल करून याच मार्गावरून वाहतूक केली जातात, ट्रक मालक जास्त गाडी भाडे मिळविण्याच्या नादात क्षमतेपेक्षा जास्त कोळसा वाहतूक करीत असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्याने वेकोलीने व कंत्राटदाराने या मार्गावर दररोज दिवसातून तीनवेळा पाणी मारणे, रस्त्यावरील खड्डे बुजविणे व तात्काळ रस्ता बांधकाम करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

आंदोलनस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आकाश बाजारे व संबंधित कंत्राटदाराचे प्रतिनिधी येऊन येत्या दहा फेब्रुवारी पासून रस्त्याचे बांधकाम सुरू करणार असून दररोज तीन वेळा रस्त्यावर पाणी मारल्या जाणार व दोन दिवसात खड्डे बुजविणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. यावेळी माजी आमदार वामनराव चटप यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. आंदोलनात रामपूर येथील सरपंच वंदनाताई गौरकार, उपसरपंच सुनिताताई उरकुडे,माजी उपसरपंच हेमलताताई ताकसंडे, ग्राम पंचायत सदस्य विलास कोदिरपाल, रमेश झाडे, सिंधू लोहे, शीतल मालेकर, सामाजिक कार्यकर्ते नामदेव गौरकार, शिवसेनाचे बबन उरकुडे, सिंधुबाई लांडे, रा कां. चे तालुका अध्यक्ष संतोष देरकर, सुधाकर काकडे, प्रभाकर लडके, राहुल बानकर, रमेश साळवे, संजय जनपल्लीवार, शंकर पाचभाई, संध्या घुघुल, कासुबाई रोगे, शोभा मानुसमारे, संविता हजारे, सिंधू रोगे, सुनंदा पोनालवार, रेखा आत्राम, वंदना अगळे, लिलाबाई जेणेकर, मारोती उरकुडे, मारोती गव्हाणे, पांडुरंग हनुमंते, प्रवीण हिंगाने, अतुल खणके, पंकज देरकर, बाबुराव रोगे, विठ्ठल पिंपळकर, हर्षल वांढरे, घनश्याम लडके, यासह अन्य नागरिक उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांना प्रमोद पणाघाटे टी-सेंटर यांच्याकडून चहाची व्यवस्था पुरविण्यात आली.

रस्त्यात मोठं मोठे खड्डे पडल्याने या मार्गवरून दररोज ये-जा करणाऱ्या शेकडो कामगार, मजूर व प्रवास धारकांना मणक्याचा, श्वसनाचा, दम्याचा, फ्फुसाच्या आजाराचा सामना करावा लागत असून रस्त्यामुळे उडणाऱ्या धुळीने वस्तीतील घरात धुळीचे थर साचले असून संपूर्ण परिवारासह गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, धुळीचे कण हवेत सतत पसरत असल्याने पर्यावरणावर मोठा परिणाम पडत असून संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत असून, येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांना या रस्त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या रोषाला समोर जावे लागणार हे निश्चित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here