संगमनेर – अकोले तालुक्यात पाकिस्तानी धुळीचे साम्राज्य… अनेकांना होतोय त्रास…
अहमदनगर
संगमनेर २४/१/२०२२
प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील
पाकिस्तान देशात निर्माण झालेल्या धुळीच्या वादळाचा मोठा फटका महाराष्ट्रा सह गुजराथ , राजस्थान , मध्य भारत यांना बसत आहे . मुंबई मध्ये जास्त प्रमाणात या धुळीची मात्रा निदर्शनास आली आहे . घरातील गच्या, मोटार गाड्या यांचा पृष्ठभाग आदी चे निरीक्षण केले असतात पांढरा रंग असलेली ही धूळ आढळून आली . गुजरात मार्गे आलेल्या धुळीचे साम्राज्य महाराष्ट्रात पोहचले असून काल रविवारी (दि.२३) ते नगर जिल्ह्यातही सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे वातावरण प्रदूषित झाले आहे. संगमनेर येथून सूर्य दर्शन चक्क चंद्र दर्शन सारखे पांढरे दिसत होते. गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्हा सकाळी पावसाळा , दुपारी उन्हाळा तर सायंकाळी हिवाळा अनुभवत आहे . निसर्गाने उन, थंडी, पावसाची बरसात सुरु केली आहे. याचा शेती बरोबर माणसे व जनावरे यांच्या ही आरोग्यावर मोठा परिणाम दिसून येत आहे . प्रतेक घरात सर्दी डोकेदुखी सह खोकला ,तर काहींना ताप व थंडी ही साथ गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात थैमान घालून आहे. महाराष्ट्रासह देशभरात कुठे दाट धुके, कुठे अवकाळी पाऊस तर कुठे कडाक्याची थंडी पडत आहे.त्यात आता हे धुळीचे वादळ आले आहे. याचा ही परिणाम आरोग्यावर मोठा होणार असून , जनतेने काळजी घ्यावी असे आवाहन डॉक्टर एकता वाबळे व डॉक्टर जगदीश वाबळे यांनी केले आहे. बाहेर शक्यतो पडू नये , मास्क चा योग्य वापर करावा , गरम कपडे वापरावीत, कान बंद असावेत , गरम व कोमट पाणी पिण्यास वापरावे, सर्दी खोकला बाबत डॉक्टर यांचे मार्गदर्शन घ्यावे असा ही सल्ला त्यांनी दिला आहे. हे धूलिकण सूक्ष्म असून घराच्या खिडक्या , दरवाजे बंद असाव्यात ,या शिवाय थंड व धूलिकण युक्त वारा असल्याने नागरिकांनी लहान मुलांची योग्य काळजी घ्यावी ,असे ही म्हटले आहे.
रविवारी पाकिस्तानातून आलेल्या या वादळाने धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद झाली आहे. यामुळे वाहन चालविताना चालकांनी तसेच श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. हे धुळीचे वादळ असल्याने पाकिस्तानातून आलेले धुलीकण हवेत पसरले आहेत. यामुळे समोरचे दिसणे कमी झाले आहे. शिवाय अधूनमधून ढगही ये-जा करत आहेत. यामुळे सूर्यप्रकाशही कमी प्रमाणात पसरला आहे. धुळीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांना बाहेर पडताना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हे वातावरण पुढील दोन दिवस राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान आज सकाळी वातावरणात बदल झाल्याचे आढळून आले आहे. काही प्रमाणात हे धूलिकण कमी झाले आहेत. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या ही आज कमी झाली आहे. संगमनेर शहर भागात आजचे तापमान किमान ११ डिग्री सेल्सअस तर काल दुपारचे तापमान २३ डिग्री सेलसिअस होते. आकाश पूर्ण ढगाळ असल्याने थंडीचा गार वारा जाणवत होता. बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या ही मर्यादित होती, एरवी गजबजाट असलेला लिंक रोड, इंदिरा गांधी मार्ग या गजबजला भागात नगण्य गर्दी, वाहतूक होती.