पहिल्याच दिवशी जनता संचार बंदीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रविवार पर्यंत जनता संचारबंदी पाळण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
सर्व दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद
आरोग्य तपासणी व स्वच्छता मोहिमेला गती
चंद्रपूर, दि.10 सप्टेंबर: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा तसेच कोरोना संसर्गाच्या साखळीला खंडित करण्यासाठी चंद्रपूर शहर तसेच लगतचे असणारे दुर्गापुर, पडोली, उर्जानगर व बल्लारपूर शहरात 13 सप्टेंबर रविवार पर्यंत जनता संचारबंदी लावण्यात आली आहे. या संचार बंदीला पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सर्व दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलेले दिसून आले. रविवार 13 सप्टेंबर पर्यंत असाच बंद कायम राहण्यासाठी सहकार्य करावे. नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
चंद्रपूर शहर तसेच लगतचे असणारे दुर्गापुर, पडोली, उर्जानगर व बल्लारपूर शहरात जनता संचार बंदीच्या काळात स्वच्छता मोहीम, निर्जंतुकीकरण तसेच आरोग्य तपासणीवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. 50 वर्षावरील सर्व नागरिकांची पल्स ऑक्सीमीटर, थर्मल स्क्रिनिंगद्वारे आरोग्य तपासणी व नोंदणी करण्यात येत आहे. सकाळपासूनच नागरिकांनी घरातच राहून कोरोना साखळी तोडण्यासाठी सहभागी होताना दिसले. शहरातील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती.
जनता संचार बंदीच्या काळात फक्त रुग्णालय, औषधालय, कृषी केंद्र, शासकीय कार्यालय, एमआयडिसी मधील आस्थापना सुरू आहेत. त्याचबरोबर दूध वितरण, पार्सल सुविधा, पेट्रोल पंप, वर्तमान पत्राचे वितरणच सुरू राहतील. सर्व किराणा, भाजी-फळे दुकाने, बाजारपेठेतील इतर दुकाने पूर्णता बंद राहतील. बँका फक्त अंतर्गत कामकाजासाठी सुरू असतील परंतु ग्राहक सेवेसाठी बंद राहतील. तसेच, सर्व पानठेले, चहा टपऱ्या, हातगाड्या, फुटपाथवरील सर्व दुकाने बंद राहतील.