प्रदूषणा विरोधात स्वाक्षरी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
२६ डिसेंबर ते ९ जानेवारीपर्यंत चालणार स्वाक्षरी अभियान
प्रतिनिधी, प्रवीण मेश्राम
गडचांदुरात प्रदूषणाने नागरिक हतबल झाले आहे. माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रदूषणाविरोधात दि. २६ डिसेंबरपासून स्वाक्षरी अभियानाला सुरुवात झाली आहे. स्वाक्षरी अभियानाला जनमानसातून चांगला प्रतिसाद मिळत असून लोकांमध्ये प्रदूषणाबाबत जनजागृतीकरिता ही मोहीम राबविण्यात येत आहे.
गडचांदुरातील जेष्ठ-प्रौढ नागरिकांच्या, युवक-युवतींच्या, बालकांच्या आरोग्यासाठी व भविष्यासाठी ही मोहीम असून स्वतःची जबाबदारी समजून प्रत्येक नागरिकांनी हिरीरीने या मोहिमेत सहभाग घेण्याचे आवाहन प्रदूषण विरोधी कृती समितीने केले आहे.
शहरातील नागरिक आपसामधील मतभेद, पक्षभेद विसरून एकत्र आल्याचे चित्र स्वाक्षरी अभियानादरम्यान बघायला मिळाले. गडचांदूरकरांसाठी प्रदूषण ही फार जटिल समस्या झाली असून अनेकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. प्रदूषणविरोधी कृती समितीने गडचांदूर शहराची प्रदूषण मुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्याचा संकल्प केला आहे. अचानक चौक, माता मंदिर पासून स्वाक्षरी अभियानाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी जवळपास एक हजार स्वाक्षऱ्या पूर्ण झाल्या.
मोहिमेत व्यापारी असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, गणेशोत्सव मंडळे, दुर्गोत्सव मंडळे, महिला-पुरुष बचत गट, शाळा-महाविद्यालये आदींनी स्वयंस्फूर्तीने सहभागी सहभागी होण्याचे आवाहन प्रदूषण विरोधी कृती समितीने केले आहे.