जिल्हा प्रशासन कुंभकर्णी झोपेत ; उपोषण कर्त्याची प्रकृती चिंताजनक
■ सिंदेवाहीच्या मुजोर तहसीलदाराला करणार घेराव – पँथर
चंद्रपुर : जिल्हाधिकारी कार्यालय समोर दिनांक २४.११.२०२१ पासून ऑल इंडिया पँथर सेनेचे सिंदेवाही तालुका महासचिव यांनी रास्त मागण्यांना घेऊन सिंदेवाही तहसीलदार यांच्या विरोधात आमरण उपोषण करीत आहेत. मात्र उपोषणाला चार दिवस उलटून गेले तरी येथील जिल्हा प्रशासनाने कोणतीही भुमिका घेतलेली नाही. उपोषण कर्त्याची प्रकृती अंत्यत चिंताजनक झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन कुंभकर्णी झोपेत तर नाही ना ? असा सवाल ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने केला जात असून सोमवारी सिंदेवाही तहसीलदार यांना घेराव करुन मागण्या पुर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही अशी भुमिका पँथर सेना घेणार असल्याचे प्रतिनिधीशी बोलतांना उपोषण स्थळी उपस्थित असलेल्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या गृह क्षेत्रात सिंदेवाही येथील तहसीलदार जगदाळे यांनी न्यायालयीन आदेश असताना केवळ बौद्ध आहे म्हणून गेल्या आठ महिण्यापासून शेतीचे फेरफार थांबवले होते. यासाठी अनेकदा न्यायाच्या मार्गाने विनंती अर्ज केला गेला. मात्र मनमानी कारभार करणाऱ्या तहसीलदार यांनी कोणतीच भुमिका घेतली नाही. केवळ टाळाटाळ करुन बौद्ध शेतकऱ्यांचा मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक छळ करीत असून अशा मुजोर व जातीवादी मानसिकतेतून काम करणाऱ्या तहसीलदार यांना तात्काळ निलंबित करुन उपोषण कर्त्याच्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात आणि उपोषणाची सांगता करावी. अन्यथा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने सिंदेवाही तहसीलदार यांना घेराव करण्यात येईल. असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.