राजूर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व राष्ट्रीय गोंडवाना पक्षा कडून क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना अभिवादन
यवतमाळ, मनोज नवले
राजूर कॉलरी : जल, जंगल व जमीन ह्या तीन महत्त्वपूर्ण नैसर्गिक साधनांवर येथील मूलनिवासी किंवा येथील जनतेचा अधिकार असून ह्या साधनांवर कोणत्याही मूठभर लोकांचा अधिकार असता कामा नये, अशी भूमिका घेऊन उलगुलान म्हणजेच भांडवलदारी विचारसरणी च्या इंग्रजांविरुद्ध व जमीनदारी म्हणजेच सरंजामशाही विरुद्ध सशस्त्र उठाव करणारे शहीद वीर बिरसा मुंडा यांना त्यांच्या 15 नोव्हेंबर जयंती निमित्त येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व राष्ट्रीय गोंडवाना पक्षाचे वतीने अभिवादन करण्यात आले.
शहीद वीर बिरसा मुंडा यांच्या अल्प 25 वर्षाच्या जीवनात त्यांनी साम्राज्यवादी इंग्रज व जमीनदारी व्यवस्थेविरोधी सशस्त्र उठाव करीत मध्यप्रदेश झारखंड, छत्तीसगढ मध्ये जनतेला एकजूट करीत जल, जंगल व जमीन यावर आदिवासींना ताब्यात घ्यायला लावले व हे नैसर्गिक साधने कोण्या एकाच्या मालकीचे नसून त्यावर जनतेची सामूहिक मालकी आहे, हे सांगितले. त्यांचा हा विचारच महत्वपूर्ण असून त्यांना खरे अभिवादन म्हणजे मूठभर लोकांच्या नैसर्गिक साधनांवर होत चाललेले अधिकार ह्याचा विरोध करणे होय. आज संपूर्ण भारतात पेसा कायदा लागू असताना ग्रामसभेच्या निर्णय महत्वपूर्ण असतानाही जंगले ही भांडवलदारांना देण्यात येत आहे. हे सर्व संविधान, कायदे तुडवून केल्या जात आहे. त्यामुळे बिरसा यांच्या विचार व त्यांच्या कृतीला अनुसरून ह्या सर्व बाबींचा विचार करून कृती करावी लागेल असे ह्या जयंती निमित्त झालेल्या अभिवादन कार्यक्रमात माकपचे कॉ. कुमार मोहरमपुरी व राष्ट्रीय गोंडवाना पक्षाचे लीलाधर अरमोरीकर यांनी आपले विचार मांडताना प्रतिपादन करीत जनतेला आवाहन केले.