एस.टी. कर्मचाऱ्यांची निघणार संदेश रॅली
म.रा.प.मं. चे राज्य शासनात विलीनीकरण कशासाठी व का? याकरिता होणार जनजागृती
अनेक सामाजिक, राजकीय संघटनांचा पाठिंबा
राजुरा 9 नोव्हेंबर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी राज्य स्तरावर दि. 28 ऑक्टोंबर पासून कामगारांचा संप सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महामंडळाच्या बसेस पूर्णपणे बंद असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून संपकरी कामगारांच्या मागण्यांकडे शासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या या त्रासाला संपकरी कामगारांपेक्षा शासन जबाबदार असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण कशासाठी व का? या संदर्भात राजुरा शहरात संपकरी कामगारांच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संदेश रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रॅली दिनांक 10 नोव्हेंबरला राजुरा शहरातील पंचायत समिती येथून सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून नाका नंबर 3, भारत चौक, गांधी चौक, नेहरू चौक, जुने बस स्थानक, तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन मुख्य बसस्थानकामध्ये संदेश रॅलीचा समारोप होईल. या संदेश रॅली ला अनेक सामाजिक, राजकीय संघटनांचा पाठिंबा असून ते सुद्धा या संदेश रॅलीत सहभागी होणार आहेत. ‘बहुजन सुखाय बहुजन हिताय ‘ या ब्रिदानुसार एस.टी. कर्मचारी कठीण काळात, कोरोना महामारी च्या काळात आपली सेवा देत आले आहेत. व जेव्हा जेव्हा राज्यावर संकट आले तेव्हा मदतीला धावून आले. जनतेला सुरक्षित प्रवासाची हमी देणारा एसटी कर्मचारी हा प्रसंगी जीवनदाता म्हणूनही समोर आला आहे. या संदेश रॅलीमध्ये सर्व नागरिक व सामाजिक, राजकीय संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन एस.टी. कर्मचारी संपकरी कृती समिती ने केले आहे.