ऐन दिवाळीच्या तोंडावर मच्छिंद्र मत्सपालन सहकारी संस्थेच्या सभासदांवर उपासमारीची वेळ
● इकोर्निया वनस्पतीने केले माशांचे जगणे कठीण
● शेकडो मासे मृत, लाखो रुपयांचे नुकसान
● नुकसान भरपाई देण्याची संस्थेची शासनाकडे मागणी
राजुरा, 15 ऑक्टोंबर : राजुरा नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या तलावामध्ये 1961 पासून नोंदणीकृत असलेल्या मच्छिंद्र मत्सपालन सहकारी संस्था मर्यादित राजुरा यांच्यातर्फे लाखो रुपयांचे मासे या तलावात सोडले जात असते व त्या माशांच्या उत्पन्नावर या संस्थेच्या तीनशे ते साडेतीनशे सभासदांचा उदरनिर्वाह सुरू असतो. कालपासून या तलावांमध्ये शेकडो मासे मृत पडत असल्यामुळे संस्थेतील सभासदांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांचे वीस ते पंचवीस लाखांचे नुकसान झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष विजय नत्थू कार्लेकर व सचिव रत्नाकर पचारे यांनी कळविले.
गेल्या दोन वर्षापासून या तलावांमध्ये सोडलेली माशांची बिजाई ही मोठ्या प्रमाणात विकसित होऊन हाताशी आलेले माशांचे उत्पन्न अचानक काल दि.14 ऑक्टोंबर पासून मृत पावत असल्यामुळे या संस्थेच्या सभासदामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. covid-19 मुळे माशांचे उत्पन्न घेता येत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मासे विकसित झाले होते. परंतु इकोर्णीया वनस्पतीने संपूर्ण तलाव वेढले असल्याने या ठिकाणी माशांचे जगणे कठीण झाले. त्यामुळे मच्छिंद्र मत्सपालन सहकारी संस्थेच्या सभासदांनी दोन ते तीन महिने स्वतः श्रमदान करून या तलावातील इकोर्निया वनस्पती काढण्यासाठी स्वच्छता अभियान राबविले. या श्रमदानाची दखल घेऊन नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम दोन ते तीन महिने राबवली. याकरिता लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. परंतु इकोर्णीया वनस्पतीला या तलावातून हद्दपार करणे मात्र शक्य झाले नाही. सध्या परिस्थितीत संपूर्ण तलाव इकॉर्निया या वनस्पतीने आच्छादलेला आहे. सध्या स्थितीत या संस्थेकडे राजुरा तालुक्यातील नगरपरिषद राजुरा चा एकमेव तलाव असल्याने या तलावाच्या भरवशावर या संपूर्ण संस्थेतील सभासदांचा उदरनिर्वाह सुरू होता. दिवाळीनंतर डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये या माशांचे उत्पन्न संस्थेतर्फे काढण्यात येणार होते. माशांना पुरेसं ऑक्सीजन उपलब्ध व्हावं व परिसरामध्ये दुर्गंधी पसरू नये याकरिता पोटॅशियम व चुन्याचा मारा आणि औषधोपचार तलावात संस्थेतर्फे करण्यात येत असतो. काल दिनांक 14 ऑक्टोंबर पासून अचानक या तलाव या मधले शेकडो मासे मृत पावत असून त्यामुळे 20 ते 25 लाखांचे नुकसान या सर्व संस्थेतील सभासदांचे झालेले आहे त्यामुळे ऐन तोंडाशी आलेला घास हिसकावल्या गेल्याने संस्थेतील सभासद हवालदिल झाले असून उदरनिर्वाहा सह जगण्याचे मोठे संकट उभे झाले आहे. तीनशे ते साडेतीनशे सभासदांचे उपजीविकेचे साधन असलेल्या या राजुरा नगरपरिषद तलावातून इकॉर्निया वनस्पती कधी हद्दपार केली जाईल याकडे संपूर्ण मच्छिंद्र मत्स्य पालन सहकारी संस्थेच्या सभासदांचे लक्ष लागले आहे. संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे नगर परिषद किंवा प्रशासनातर्फे तात्काळ या नुकसानीची दखल घेऊन त्वरित नुकसान भरपाई व आर्थिक मोबदला मिळावा अशी मागणी मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष विजय नथू कार्लेकर व सचिव रत्नाकर पचारे, विजय पचारे, अमित मांढरे, विदेश मांढरे सह सर्व सभासदांनी केली आहे. इकोरिया वनस्पतीने राजुरा नगर परिषद तलावाच्या सौंदर्यामधे अडथळा निर्माण केला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे.
“तीनशे ते साडेतीनशे सभासदांचे उदरनिर्वाह असलेल्या या राजुरा नगरपरिषद तलावांमध्ये काल दि. 14 ऑक्टोंबर पासून शेकडो मासे मृत पावले असून त्यामुळे जवळपास 20 ते 25 लाखांच्या आर्थिक नुकसानीचा फटका हा संस्थेला बसला आहे. इथे पसरलेल्या इकॉर्निया वनस्पतीच्या स्वच्छते करिता संस्थेतर्फे श्रमदान करण्यात आले व नगर परिषदेने ही माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबवली परंतु अजूनही इकॉर्निया वनस्पती मात्र पूर्णपणे नष्ट झाली नसून संपूर्ण तलावाला या इकॉर्निया वनस्पतीने आच्छादले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर संस्थेतील सभासदांच्या झालेल्या नुकसानीमुळे तूर्तास संपूर्ण सभासदां पुढे उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे ठाकले आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या नुकसानीची दखलघेत पंचनामे करून आर्थिक मोबदला द्यावा व इकोर्निया वनस्पती समूळ नष्ट करावी.”
विजय नथू कार्लेकर
अध्यक्ष, मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्था मर्या राजुरा