संगमनेर शहरातील बेकायदा कत्तलखाना बाबत सखोल चौकशी करा – शंकर गायकर
संगमनेर (अहमदनगर), ज्ञानेश्वर गायकर पाटील
संगमनेर शहरात मोठया प्रमाणावर गोवंश हत्या होत असून त्यातून होणाऱ्या आर्थिक तडजोडीबद्दल संगमनेर शहरातील जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस महासंचालक, मुंबई यांची भेट घेणार असून दोषीवर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद करणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र- गोवा राज्य क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी संगमनेर विश्रामगृह येथे बोलताना सांगितले. त्यांनी नुकतीच संगमनेर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वरील विधान केले.
गोवंशाच्या बेकायदा कत्तलीसाठी संपूर्ण राज्यात बदनामी झालेल्या संगमनेरातील कत्तलखान्यांवर आजवरची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. भिवंडी येथील प्राणी कल्याण अधिकारी यतीन जैन व बजरंग दल यांच्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने शनिवारी रात्रभर ही कारवाई सुरु होती. या कारवाईत पाच कत्तलखान्यांमधून जवळपास ६२ लाख रुपयांच्या ३१ हजार किलो गोवंशाच्या मांसासह पोलिसांनी १ कोटी ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे, मात्र २ जणांना अटक झाल्याने उर्वरित ५ अटक होणे गरजेचे आहे. “वारंवार त्याच आरोपींवर गुन्हे दाखल असल्याने त्यांना हद्दपार नाहीतर गजाआड करण्याची गरज आहे.”
कत्तलखान्यांवर कारवाई झाल्यानंतर जप्त केलेले मांस हे गोमांसच असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्याची डी.एन.ए चाचणी करावी लागते. त्यासाठी आवश्यक असलेले मांसाचे नमुने घेण्याची जबाबदारी अधिकार्यांची असते. मात्र अनेक प्रकरणांमध्ये असे नमूनेच घेतले गेले नाहीत, काही प्रकरणात नमूने बदलण्यात आले असून यातही काही तरी आर्थिक हित असल्याचा आरोप ही त्यांनी केला.अशा प्रकरणांची चौकशी करुन दोषी असलेल्या अधिकार्यांचीही चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी गायकर यांनी केली.
गोवंश हत्या बंदी झाल्यापासून आज पर्यंत अनेक गुन्हे संगमनेर येथे दाखल आहेत. “गोवंश हत्या बंदी कायद्यात कोणतीही पळवाट नसतांना, एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही.” त्यामुळे तपासात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या जातात का याचीही चौकशी केली पाहिजे.
७ दिवसांत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास संपूर्ण राज्यात मोठे आंदोलन उभे केले जाईल असे ही शंकर गायकर यांनी सांगितले.
व्यासपीठावर वि.हिं.प. बजरंग दल महाराष्ट्र- गोवा राज्य क्षेत्रीय सहसंयोजक विवेक कुलकर्णी व वि.हिं.प. नगर जिल्हा संघटन मंत्री प्रशांत बेल्हेकर ,राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. दरम्यान संगमनेर मधील बेकायदेशीर कत्तलखाने नगरपालिका प्रशासन यांनी जमीनदोस्त केले आहेत. आढवड्याच्या सुरवातीला सर्व पक्षीय, तसेच बजरंग दल व अन्य हिंदुत्ववादी संघटना व नागरिक यांनी कत्तलखाना हटाव मोहिम हाती घेतली होती. संगमनेर प्रसाशासाने उचित कारवाई करत आंदोलनकर्त्याची ही प्रमुख मागणी ४८तासात पूर्ण केली आहे.विश्व हिंदू परिषद चे प्रांतिक प्रमुख शंकर गायकर यांनी ही या बाबत सखोल माहिती घेऊन पत्रकार परिषद घेतली आहे.