वणी विभागातील कलावंत घडविणारा एक स्तुत्य उपक्रम : गजानन कासावार
मासिक संगीत सभा संपन्न
वणी/यवतमाळ, मनोज नवले
तळागाळातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी संगीत क्षेत्रातील कलावंतांना एकत्र करून त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी धडपड करून मासिक संगीत सभा घेणे हे खूप उत्तम कार्य आहे. हे कार्य करतांना आयोजकांना होणारा मानसिक, शारीरिक त्रास व आर्थिक व्यवस्था करणे हे खूप कठीण काम आहे. हा एक स्तुत्य उपक्रम असून वणी परिसरातील कलावंताने आवर्जून सहभाग घेणे आवश्यक आहे. असे मनोगत नगर परिषद शाळा क्र 5 चे मुख्यध्यापक गजानन कासावार यांनी व्यक्त केले.
जैताई देवस्थान व संस्कार भारती समिती द्वारे आयोजित मासिक संगीत सभा जैताई मंदिर येथे संपन्न झाली. संस्कार भारती समितीच्या अध्यक्षा कविता चटकी यांनी प्रास्ताविक केले तसेच जैताई देवस्थान चे सचिव व सामाजिक कार्यात अग्रेसर, विविध उपक्रमास सदैव प्रोत्साहन देणारे माधवराव सरपटवार यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
या मासिक संगीत सभे मध्ये मारेगाव तालुक्यातील किन्हाळा येथील प्रदीप जगताप यांनी सुरेल भक्तीगीत सादर केले तसेच नरसाळा येथील नवोदित कलावंत अनिरुद्ध सुरतेकर याने नवनवीन अभंग सादर करून रसिकांची मने जिंकली. वसुधा पवार व मृदुला कुचनकर या दोघींनी “कान्हाडा राजा पंढरीचा” हा अभंग जुगलबंदी मध्ये सादर करून सर्वाना मंत्रमुग्ध केले. संगीताचा वारसा लाभलेली 5 वर्षाची नवोदित बाल गायिका राधा कुचनकर हिच्या “माझा बाप्पा किती गोड दिसतो” ह्या गीतावर उपस्थितांनी कौतुकाचा वर्षाव केला.
वणी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. भालचंद्र आवारी यांनी पाहुणे कलाकार म्हणून तबल्यावर सुरेख साथसंगत केली. ढोलक अक्षय करसे, हार्मोनियम संजय मेश्राम व अक्षत जाधव यांनी केली. कार्यक्रमाचे संगीत संयोजन वणीचे प्रसिद्ध तबला वादक अभिलाष राजूरकर, कार्यक्रमाचे नियोजन संस्कार भारती समितीचे प्रमुख सागर मुने, संचालन कविता सातपुते तसेच अर्जुन मेडिकल चे लक्ष्मीकांत हेडाऊ, साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीचे कुणाल वासेकर , सुमन डेकोरेशन चे संचालक संदीप आस्वले यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी सचिन चव्हाण, समीक्षा काटकर, ज्योती राजूरकर, यशवंत खिरटकर, सागर बरशेट्टीवार, वनिता काकडे, प्रवीण सातपुते, आकाश बोथले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.