दहेली डांबर प्लांटने नाल्याचे पाणी प्रदूषित
रसायनयुक्त पाण्याने जनावरांना व शेतीला धोका, शेतकऱ्यांत संताप
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी :- ( राज जुनघरे )
बल्लारपूर तालुक्यातील दहेली येथील डांबर प्लांटचे रसायनयुक्त पाणी नाल्यात सोडण्यात येत असल्याने नाल्याचे पाणी प्रदूषित होत असून त्याचा विपरीत परिणाम जनावरांच्या आरोग्यावर व शेती सिंचनाला होत असल्याने गावकर्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.सदर प्रकार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आशीर्वादाने मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. रसायनयुक्त पाणी नाल्यात सोडण्यात येऊ नये अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
बल्लारपूर जवळ दहेली येथे नाल्याच्या काठावर डांबर प्लांट व खर्डा फॅक्टरी आहे.यातील केमिकल मिश्रित पाणी नाल्यात सोडण्यात येते.नाल्याच्या शेजारी दहेली व लावरी गावकऱ्यांची शेकडो एकर शेती शेती असून याच नाल्याच्या पाण्याचा वापर शेती सिंचनासाठी करण्यात येतो.तसेच गावातील शेतकर्यांचे पाळीव जनावरे याच नाल्यातील पाणी पीत असतात.
लावारी व दहेली या गावातील शेकऱ्यांची शेकडो एकर शेती असून ती याच नाल्याच्या पाण्याने ओलित केल्या जाते. रसायनमिश्रित पाणी असल्याने शेतपिकावर त्याचा दुष्परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.गावातील पाळीव जनावर नाल्याचे पाणी पिल्याने त्यांचेवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन गतप्राण होत असतात. रसायनमिश्रित पाणी असल्याने नाल्याचे पाणी दूषित होऊन सर्वत्र दुर्गंधी पसरून उग्र वास दरवळत असतो.शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा वास सहन होत नाही.याकडे प्रदूषण विभागाने लक्ष घालणे आवश्यक आहे.डांबराने भरलेले अवजड वाहनाची सतत सतत वर्दळ असते त्यामुळे लावारी दहेली दीड वर्षांपूर्वी करण्यात आलेला रस्ता जागोजागी उखडला असून नाल्यावरील पुलाला धोका निर्माण झाला आहे.पुलाच्या रापटावर खड्डे पडले आहेत.गावातील नागरिकांना या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते.
“दहेली येथे डांबर प्लांट व खर्डा फॅक्टरी असून यातील रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडण्यात येत असल्याने पाणी प्रदूषित होऊन त्याचा विपरीत परिणाम शेतीवर व जनावरांच्या आरोग्यावर होत आहे.या मार्गावरील अवजड वाहनाने रस्ते उखडले आहेत.प्रदूषण मंडळाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.”
योगेश पोतराजे
सरपंच, लावारी ( दहेली )