चंद्रपूर पोलीस विभाग व युथ फॉर पिपल मुंबई च्या वतीने सामाजिक दायित्वातून गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वितरण
राजुरा, अमोल राऊत : कोरोना महामारीच्या काळात कित्येक गरीब व गरजू कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांच्या हातचा रोजगार गेला. हिरावलेला रोजगार व कोविड-१९ च्या लॉकडाऊन मुळे, हातावर पोट असलेल्यांना जिकिरीचा सामना करावा लागला. याचे भान ठेवून ‘युथ फॉर पिपल मुंबई’ समाजसेवी संस्था व चंद्रपूर पोलिस विभाग यांनी सामाजिक दायित्वातून राजुरा व गोंडपीपरी तालुक्यातील १०० टक्के आदिवासी गावातील गरीब व गरजू कुटुंबांना मदत करण्याच्या उद्देशाने अन्नधान्य किट वाटपाचा अभिनव उपक्रम हाती घेतला.
उपविभाग राजुरा अंतर्गत येणाऱ्या उप पोलीस स्टेशन लाठी हद्दीतील वामनपल्ली या गावातील १०५ आदिवासी बांधवांना १० जुलै २०२१ला तांदूळ,डाळ,तेल पाकिटचे वितरण करण्यात आले. तसेच १२ तारखेला पोलीस स्टेशन राजुरा ठाणे हद्दीतील आनंदगुडा व जंगुगुडा या आदिवासी बहुल गावातील ७० ग्रामस्थांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. सदर उपक्रमात जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे,अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार व युथ फॉर पिपल मुंबई या संस्थेच्या वतीने आदिवासी बांधवांना सामाजिक दायित्वातून अन्नधान्य साहित्य किट वाटप करण्यात आल्या.
यावेळी अपर पोलीस अधिक्षक यांनी गावातील लोकांशी संवाद साधून गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ऑनलाईन द्वारे होणाऱ्या आर्थिक फसवणुकीबाबत जनजागृती केली. राजुरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनील झुरमुरे, लाठीचे ठाणेदार प्रदीपकुमार राठोड, लक्कडकोटचे पोलीस पाटील, वामनपल्ली येथील साईनाथ कोडापे तसेच पोलीस कर्मचारी यांनी भाग घेतला.