Home गडचिरोली काँग्रेसचे नैराश्यातून बेछूट आरोप; केवळ राजकारणासाठी ‘एमआयडीसी’च्या विषयाचा वापर

काँग्रेसचे नैराश्यातून बेछूट आरोप; केवळ राजकारणासाठी ‘एमआयडीसी’च्या विषयाचा वापर

0
76

काँग्रेसचे नैराश्यातून बेछूट आरोप; केवळ राजकारणासाठी ‘एमआयडीसी’च्या विषयाचा वापर

गडचिरोली, सुखसागर झाडे :-जिल्ह्याची ‘नक्षलग्रस्त’ ही जुनी ओळख पुसून येथे उद्योगांचे जाळे विणण्याचे स्वप्न आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी पाहिले आहे. जिल्ह्याचा कायापालट होऊन स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, या प्रामाणिक सामाजिक हेतूने महायुती सरकार काम करत असताना, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि मंडळी केवळ राजकीय नैराश्यातून बेछूट आरोप करत आहेत.
भेंडाळा परिसरातील १४ गावांचा प्रश्न हा प्रशासकीय स्तरावर पाहणीचा विषय असताना, त्याचे भांडवल करून भाजपवर चिखलफेक करणे हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे. मुळात, या क्षेत्राची एमआयडीसीसाठी निवड कोणत्या सरकारच्या काळात झाली, हे काँग्रेस नेत्यांनी एकदा आरशात पाहून तपासावे.
आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय एका गुंठाही जमिनीचे संपादन होऊ दिले जाणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. या संदर्भात मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांशी वारंवार चर्चा केली असून, शेतकऱ्यांचे नेमके मत आणि त्यांच्या भावना प्रभावीपणे त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन घेतली जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.
या सर्वपक्षीय आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी आहेत, तरीही काँग्रेस नेते केवळ ‘क्रेडिट’ घेण्याचा आणि ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
काँग्रेसच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या हिताशी काहीही देणेघेणे नाही. केवळ दबावतंत्र वापरून आपले ‘हप्ते’ वाढवून घेणे, हाच यामागील त्यांचा खरा उद्देश आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे सर्व स्टंट सुरू आहेत. यापूर्वी हनुमान चालीसा पठणाच्या नावाखाली मंदिरांमध्ये केवळ फोटोसेशन करून देवाला फसवणाऱ्यांना शेतकऱ्यांची काय चिंता असणार? ज्यांनी श्रद्धेशी प्रतारणा केली, ते जनतेशी कधीच प्रामाणिक राहू शकत नाहीत. जनतेची दिशाभूल थांबवून काँग्रेसने जिल्ह्याच्या विकासाला साथ द्यावी, हीच आमची अपेक्षा आहे.

यावेळी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री अनुसूचित जनजाती डॉ. अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, नगराध्यक्ष सौ. अँड. प्रणोतीताई निंबोरकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जेष्ठ नेते रमेश भुरसे, तथा नगरसेवक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!