Home गडचिरोली एकलव्य आश्रमशाळेच्या वसतिगृहात सतरा वर्षीय विद्यार्थ्यांची गळफास घेत आत्महत्या

एकलव्य आश्रमशाळेच्या वसतिगृहात सतरा वर्षीय विद्यार्थ्यांची गळफास घेत आत्महत्या

0
51

एकलव्य आश्रमशाळेच्या वसतिगृहात सतरा वर्षीय विद्यार्थ्यांची गळफास घेत आत्महत्या

आत्महत्येच गुढरहस्य मात्र गुलदस्त्यात कायम

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील शांतिनगर येथील रहिवासी असलेला १७ वर्षीय प्रिन्स गुप्तनाथ मेश्राम हा गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून बायपास मार्ग सेमाना देवस्थान कडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या एकलव्य आश्रम शाळेच्या वसतिगृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रिन्स मेश्राम हा अकरावी वर्गात शिक्षण घेत होता व त्याचे वय १७ वर्षे होते. तो एकलव्य आश्रम शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत होता. सायंकाळी सुमारे ६:२० वाजताच्या दरम्यान तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेच्या वेळी प्रिन्सचे आई-वडील हे कामानिमित्त भेटापल्ली परिसरात गेले होते. विशेष म्हणजे, मृतकाची आई ही शिक्षिका असून प्रिन्स हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शांतिनगरसह परिसरात शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे पाठविण्यात आला. रुग्णालय सूत्रांच्या माहितीनुसार, मृतदेहाचे शवविच्छेदन दुसऱ्या दिवशी सकाळी करण्यात येणार आहे.

या घटनेनंतर मृतकाच्या कुटुंबीयांसह स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. आश्रम शाळेसारख्या संस्थेमध्ये विद्यार्थ्याने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलणे ही अत्यंत गंभीर बाब असून यामागील नेमके कारण शोधणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती घेण्यासाठी समाज कल्याण अधिकारी सचिन मडावी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. तसेच, एकलव्य आश्रम शाळेच्या प्राचार्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्याचे दिसून आले. याशिवाय, जिल्हा प्रकल्प अधिकारी एम. अरुण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनीही मोबाईल उचलला नाही.

विशेष म्हणजे, ही घटना घडून तब्बल ४ ते ५ तास उलटूनही कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. तसेच, या घटनेची माहिती प्रकल्प अधिकारी व जिल्हा प्रशासनाकडून गोपनीय ठेवली जात असल्याची भावना व्यक्त होत असून त्यामुळे शंका-कुशंकांना अधिक वाव मिळत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, सामान्य रुग्णालयात एकलव्य आश्रम शाळेचे शिक्षक उपस्थित असतानाही त्यांनी मुद्दाम कोणतीही माहिती देण्यास नकार दिल्याचे मृतकाच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. यामुळे आश्रम शाळेच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!