कांग्रेस पक्ष अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील
शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय एक इंचही जागा अधिग्रहण करू देणार नाही – आमदार विजय वडेट्टीवार
गडचिरोली, सुखसागर झाडे :-जिल्ह्यात उद्योगांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावण्याचे षडयंत्र सुरू असून, या प्रक्रियेत सत्ताधारी भाजपशी संबंधित नेत्यांची भागीदारी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारला कडक इशारा दिला की, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय एक इंचही जमीन अधिग्रहित करू देणार नाही.
विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, गडचिरोली जिल्ह्याचा ७०% भाग जंगलाने व्यापलेला आहे. केवळ ३०% जमीन शेती आणि वस्तीसाठी उपलब्ध असताना, आता चामोर्शी तालुक्यातील १४ गावांमधील सुपीक जमीन अधिग्रहित केली जात आहे. आगामी काळात आणखी ३३ गावे या प्रक्रियेत येणार असून, यामुळे सुमारे ५० गावे ओसाड पडण्याची आणि हजारो शेतकरी भूमिहीन होऊ शकतात अस वडेट्टीवार म्हणाले.
एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांना प्रति एकर केवळ ५ ते ८.५ लाख रुपये दिले जात आहेत, जो अत्यंत कमी मोबदला आहे. उद्योगांना आमचा विरोध नाही, उद्योग यावे,विकास व्हावा पण त्यासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमिन न घेता पडीक जमिनीवर उभारावेत. जिल्ह्यात उद्योग येतो म्हणजे रोजगार निर्मिती होते या दाव्याची हवा वडेट्टीवार यांनी काढली. यापूर्वी आलेल्या उद्योगांनी स्थानिकांना किती रोजगार दिला? स्थानिकांच्या हाती केवळ ‘खाणी खणण्याचे’ काम का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लोहखनिज वाहतुकीमुळे जिल्ह्यात २०० हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे, तरीही मृतांच्या नातेवाईकांना कोणतीही मदत मिळालेली नाही. आदिवासींच्या जमिनी भाडेतत्त्वावर घेऊन त्यांच्या मूळ संस्कृतीला धक्का लावण्याचे काम सुरू आहे,असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
गडचिरोली जिल्ह्याला मायनिंगमधून मिळणारा ४०० ते ४५० कोटींचा महसूल जातो कुठे? तो जनतेच्या कल्याणासाठी वापरला जातो का? जर सरकारने बळजबरीने जमिनी घेतल्या तर काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील आणि तीव्र आंदोलन करेल अशी भूमिका वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली.









