जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कवठाळ्याच्या लेकीची भरारी ; रूपाली टेकामची ‘खाकी’ वर्दीला गवसणी!
नागपूर ग्रामीण पोलीस भरतीत एसटी प्रवर्गातून प्रथम ; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश
कोरपना :- “स्वप्न पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत जर जिद्द असेल, तर गरिबी आणि प्रतिकूल परिस्थिती कधीच अडसर ठरू शकत नाही,” हे कोरपना तालुक्यातील कवठाळा येथील रूपाली अनिल टेकाम हिने सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातील असलेल्या रूपालीने नागपूर ग्रामीण पोलीस भरतीमध्ये अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून चक्क प्रथम क्रमांक पटकावून खाकी वर्दी परिधान करण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण गडचांदूर परिसरात आणि तिच्या मूळ गावी आनंदाचे वातावरण पसरले आहे.
संघर्षातून यशाचा मार्ग
रूपालीचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. तिचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून, जेमतेम शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आर्थिक अडचणींचे डोंगर समोर असतानाही रूपालीने कधी हार मानली नाही. तिने आपले प्राथमिक शिक्षण कवठाळा येथे पूर्ण केले, तर उच्च शिक्षणासाठी ती गडचांदूर येथे आली. पदवीचे शिक्षण घेत असतानाच तिला पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याची ओढ लागली. घरात आर्थिक टंचाई असूनही तिच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या स्वप्नांना पूर्ण पाठबळ दिले.
निकालात मारली बाजी
स्पर्धा परीक्षेचा खडतर अभ्यास आणि मैदानी चाचणीचा सराव अशा दोन्ही आघाड्यांवर रूपालीने प्रचंड मेहनत घेतली. ‘ऐमर्स अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, गडचांदूर’ येथे तिने योग्य मार्गदर्शन घेतले. नुकत्याच झालेल्या नागपूर ग्रामीण पोलीस भरतीमध्ये तिने १५० पैकी तब्बल १२९ गुण मिळवून आपल्या प्रवर्गात अव्वल स्थान पटकावले. तिच्या या कामगिरीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
यशाचा मार्ग हा संघर्षातूनच जातो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संकटांना न डगमगता आपले ध्येय गाठावे. माझ्या या यशात माझे आई-वडील आणि मला योग्य दिशा दाखवणारे माझे शिक्षक यांचा मोठा वाटा आहे :- रुपाली टेकाम कवठाळा
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रतिभा आहे, फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आणि ते रूपालीने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले :- प्रा. नानेश्वर धोटे ‘ऐमर्स अकॅडमी गडचांदूर









