लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन मार्फत मुरसा येथे जैविक खत निर्मिती व उपयोग विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा
मुरसा : लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या वतीने मुरसा येथील शेतकरी प्रशिक्षण केंद्रात “जैविक खत निर्मिती प्रक्रिया व त्याचा उपयोग” या विषयावर दिनांक २४ मार्च रोजी मार्गदर्शनपर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला परिसरातील विविध गावांतील शेतकरी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन शेतकरी प्रशिक्षण केंद्र मुरसा येथील वरिष्ठ अधिकारी डॉ. महेंद्र वैरागडे यांनी केले. त्यांनी शेतकऱ्यांना जैविक खताचे महत्त्व पटवून देत रासायनिक खतांच्या तुलनेत त्याचे फायदे स्पष्ट केले. तसेच जैविक खत कशा प्रकारे घरच्या घरी सहज रित्या तयार करता येते याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणामध्ये जीवामृत, दशपर्णी अर्क, अग्निअस्त्र, गांडूळ खत निर्मिती, नाडेप व अंडा संजीवक यांसारख्या विविध जैविक घटकांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या सर्व घटकांची निर्मिती कशा प्रकारे करावी याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले, ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला. रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची होणारी हानी लक्षात घेता जैविक खताचा वापर कसा फायदेशीर ठरतो, यावर विशेष भर देण्यात आला.
या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश जमिनीचा पोत सुधारणे हा असून, अतिरिक्त कीटकनाशकांच्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी प्रशिक्षण केंद्र, मुरसा येथील व्यवस्थापक डॉ. आदित्य कदम यांनी याबाबत सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. सहभागी शेतकरी व महिलांनी उत्साहाने प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमाचे नियोजन शेतकरी प्रशिक्षण केंद्र येथील अधिकारी श्री. महेश उपरे तसेच तांत्रिक सहायक श्री. गजानन बोबडे, श्री. आदित्य मोहितकर, श्री. अभिजित चौधरी यांनी केले.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्यास प्रोत्साहन मिळणार असून, उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.









