राजुरा तालुक्यातील लक्कडकोट RTO चेकपोस्टवर पुन्हा ACB चा सापळा; लाचखोरीचा खेळ उघड — आरोपी फरार, व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह ???
राजुरा:चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील लक्कडकोट आरटीओ चेकपोस्टवर पुन्हा एकदा लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आले असून अँटी करप्शन ब्युरो, नागपूरच्या पथकाने सोमवारी (दि. 23 मार्च 2026) केलेल्या सापळा कारवाईमुळे आरटीओ व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. एका ट्रकचालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, कागदपत्र तपासणीच्या नावाखाली “एन्ट्री” म्हणून नियमित लाच उकळली जात असल्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती एसीबीकडे पोहोचली होती. विशेष म्हणजे ही वसुली थेट अधिकाऱ्यांकडून न होता त्यांच्या खाजगी एजंटांमार्फत होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
या तक्रारीची पडताळणी करून एसीबीच्या पथकाने सापळा रचला असता, खाजगी एजंट विलास देशमुख याने पंचासमक्ष 500 रुपयांची लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाले. या व्यवहाराला मोटार वाहन निरीक्षक पवन प्रभाकरराव पोटदुखे यांनी प्रोत्साहन दिल्याचेही उघड झाले. मात्र, कारवाईदरम्यान सापळ्याचा संशय आल्याने दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले, ही बाब अधिकच धक्कादायक मानली जात आहे. त्यानंतर करण्यात आलेल्या झडतीमध्ये कार्यालयातून 7,120 रुपयांची रोख रक्कम आणि सापळ्यातील 500 रुपये जप्त करण्यात आले असून राजुरा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लक्कडकोट चेकपोस्टवरील हा प्रकार काही नवीन नाही. यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या तक्रारी आणि कारवाया झालेल्या असूनही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला दिसत नाही. यामुळे संपूर्ण यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार सापळे लागूनही काही अधिकारी निर्भयपणे लाच मागताना दिसतात, यामुळे “कारवाईची भीती उरलीच नाही का?” असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे. स्थानिक ट्रकचालक आणि व्यापाऱ्यांमध्ये याबाबत तीव्र नाराजी असून “सरकारी पगार असूनही लाच का घेतली जाते? एवढ्या वेळा कारवाई होऊनही ही सवय सुटत नाही का?” असा संतप्त सूर उमटताना दिसत आहे.
या प्रकरणामुळे आणखी एक गंभीर मुद्दा पुढे येतो तो म्हणजे, अशा प्रकारांमध्ये केवळ एखादा नवीन मोटार वाहन निरीक्षकच जबाबदार असतो की पडद्यामागे काही मुरलेले चेहरे संपूर्ण व्यवस्था नियंत्रित करत असतात? खाजगी एजंटांच्या माध्यमातून होणारी वसुली, ठराविक “एन्ट्री” रक्कम आणि त्यामागील साखळी पाहता हा प्रकार केवळ एक-दोन व्यक्तींपुरता मर्यादित नसून संघटित स्वरूपात चालत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
दरम्यान, अॅन्टी करप्शन ब्युरोकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास निर्भयपणे पुढे येऊन तक्रार नोंदवावी. मात्र, वारंवार होणाऱ्या अशा कारवायांनंतरही परिस्थितीत बदल होत नसल्याने केवळ सापळे रचून कारवाई करण्यापलीकडे जाऊन प्रशासनाने ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
लक्कडकोट चेकपोस्टवरील ही कारवाई केवळ एक घटना नसून व्यवस्थेतील खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराचे द्योतक ठरत आहे. कारवाईनंतर काही दिवस गदारोळ होतो, पण पुन्हा सगळे पूर्ववत होते, अशी भावना सर्वसामान्यांमध्ये पसरली आहे. त्यामुळे आता खरी अपेक्षा ही केवळ आरोपींना पकडण्याची नसून संपूर्ण व्यवस्थेतील दोषांवर कठोर प्रहार होण्याची आहे. अन्यथा, “सापळे लागतील, बातम्या येतील आणि भ्रष्टाचार सुरूच राहील” अशीच परिस्थिती कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.








