११ जहाल नक्षल्यानी गडचिरोली पोलिसांपुढे केले आत्मसमर्पण
गडचिरोली, सुखसागर झाडे
मागील अनेक दशकापासून विविध दलममध्ये कार्यरत ११ जहाल नक्षल्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात १ विभागीय समिती सदस्य, एक क्षेत्र समिती सचिव, एक प्लाटून पार्टी सदस्य, १ कमांडर, १ क्षेत्र समिती सदस्य आणि अन्य ६ दलम सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्यावर एकूण ६८ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर होतं.
सोनी उर्फ बाली वत्ते मट्टामी, बुदरी उर्फ रामबत्ती आयतू मट्टामी, सुखलाल बोळगा कोक्सा, शांती उर्फ सोमरी गंगा तेलामी, यमुनक्का उर्फ रुखमाक्का पेंदाम, गणेश कोवासी, मिनको उर्फ जमनी काऱ्या मट्टामी, धनू दसरु वेळंजे, सुनीता उर्फ वंगे वत्ते होयाम, रमेश पांडू मडावी आणि किशोर सुक्रय्या वासम यांनी आज आत्मसमर्पण केलं. नक्षल आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून आजतागायत ७४९, तर २०२५ पासून १२३ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.
याप्रसंगी नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, केंद्रीय राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, गोकुल राज जी, अभियानप्रमुख विशाल नागरगोजे उपस्थित होते.









