युद्ध रणांगणावर… धग मात्र स्वयंपाकघरात…
महागाईच्या सावलीत जगणारी सामान्यांची चूल
वृत्तसंकलन : सुखसागर झाडे
महागाईच्या ज्वाळांनी आता, चुलीचा धूरही जड झाला,
रिकाम्या भांड्यांच्या तळाशी, चिंतेचा सडा पडला.
तेल-गॅसच्या दरवाढीने, संसाराचा चक्काचूर झाला,
साध्या भोळ्या जगण्याचाही, हिशेब आता मोठा झाला.
आज जग प्रगतीच्या शिखरावर पोहोचल्याच्या कथा सांगितल्या जातात. विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधुनिकतेच्या गजरात आपण पुढे जातोय असं दिसतं. पण या सगळ्या प्रगतीच्या गडबडीत एक साधं वास्तव मात्र अजूनही तसंच उभं आहे—सामान्य माणसाची चूल. ग्रामीण भाग असो किंवा शहरातील मध्यमवर्गीय घर, दिवसाची सुरुवात आणि शेवट आजही स्वयंपाकघराच्या धुराशीच जोडलेला आहे.
परंतु अलीकडच्या काळात वाढणारी महागाई ही या चुलीभोवती फिरणाऱ्या संसाराला जाळू लागली आहे. गॅसचे वाढते दर, तेलाच्या बाटलीवर चढलेली किंमत आणि बाजारात महाग होत चाललेले अन्नधान्य—या सगळ्यामुळे सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याचा हिशेबच बदलून गेला आहे. आज स्वयंपाकघरात फक्त भाकरी शिजत नाही; तिथे उकळत असते उद्याची चिंता, वाढत्या खर्चाची धास्ती आणि जगण्यासाठीची अखंड धडपड.
गॅसचे दर असोत वा तेलाच्या बाटलीवर चढलेली किंमत—हे केवळ आकडे नसतात. ते एका बापाने मुलाच्या शिक्षणासाठी साठवलेल्या पैशांवर पडलेले ओरखडे असतात. एखाद्या आईने घरखर्चासाठी केलेली काटकसर, एखाद्या मुलाने मनात दडवून ठेवलेली छोटी इच्छा—महागाई वाढली की या सगळ्यांवर एक अदृश्य सावली पडते.
जेव्हा महागाई वाढते, तेव्हा गरिबाच्या ताटातून सर्वप्रथम भाजी कमी होते. घरातल्या छोट्या इच्छा गप्पच बाजूला पडतात. मुलाला हवं असलेलं खेळणं पुढच्या महिन्यावर ढकललं जातं. आईची नवीन साडी घेण्याची इच्छा मनातच दडपली जाते. ज्याला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, त्याने हे वाढते दर कसे सोसायचे? एक वेळचं खाऊन पोटाला चिमटा घेणं ही केवळ म्हण नाही; ती अनेक घरांमधील रोजची वेदना आहे.
युद्धाचा तो वणवा पेटतो, बड्यांच्या त्या नकाशावर,
पण त्याची धग मात्र पोहोचते, गरिबाच्या त्या उंबरठ्यावर.
विनाशाच्या या खेळात मग, सामान्य माणूस होरपळतो,
कुणाचे तरी स्वार्थ इथे, रक्ताच्या या पुरात खेळतो.
आज हे जग एका छोट्या खेड्यासारखं झालं आहे असं म्हटलं जातं. एका देशात घडणारी घटना दुसऱ्या देशावर परिणाम करते. पण या जागतिक घडामोडींचा सर्वात मोठा भार सामान्य माणसालाच सहन करावा लागतो.
जगाच्या नकाशावर कुठेतरी दोन देश एकमेकांशी भिडतात. सीमांवर धुराचे लोट उठतात, बॉम्ब फुटतात, आणि मोठ्या सभागृहांत युद्धाचे निर्णय घेतले जातात. त्या निर्णयांमध्ये राजकारण असतं, सामर्थ्य असतं, आणि स्वार्थही असतो. पण त्या युद्धाचा खरा परिणाम मात्र सामान्य माणसाच्या आयुष्यावर उमटतो.
रशिया-युक्रेन असो वा इतर कोणताही जागतिक संघर्ष—त्याचे निर्णय हजारो किलोमीटर दूर घेतले जातात. पण त्याचे पडसाद मात्र आपल्या गावाकडच्या छोट्या बाजारात उमटतात. तिकडे रणांगणावर गोळीबार होतो, आणि इकडे पेट्रोल, गॅस, तेल यांच्या किंमती वाढतात. त्या वाढत्या किंमतींचं ओझं चुलीपाशी उभ्या असलेल्या माणसाच्या खांद्यावर येतं.
तो माणूस तेव्हा फक्त भाकरी शिजवत नसतो; तो आपल्या कष्टाने जगण्याचा नवा हिशेब मांडत असतो. घरातल्या प्रत्येक खर्चाचा विचार करत, उद्याच्या दिवसाला तोंड देण्याची तयारी करत असतो.
नावे कोरती इतिहासावर, स्वतःची ही मोठी माणसे,
किंमत मोजतो सामान्य माणूस, सोसत नशिबाचे फासे.
विजयाचा तो गुलाल उधळतो, राजवाड्याच्या शिखरावर,
घामाचे अन् रक्ताचे सडे, गरिबाच्या या उंबरठ्यावर.
उद्या जेव्हा या काळाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यात मोठ्या नेत्यांची भाषणं, युद्धाचे निर्णय आणि विजयाच्या घोषणा यांची नोंद असेल. पण त्या इतिहासामागे किती सामान्य लोकांनी आपला घास कमी केला, किती घरांनी काटकसर करून संसार टिकवला, आणि किती आई-वडिलांनी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून कुटुंबाला आधार दिला याची नोंद कदाचित कुठेच नसेल.
कारण इतिहासाच्या पानांवर मोठ्या घटनांची नोंद होते, पण त्या घटनांची खरी किंमत मात्र सामान्य माणसाच्या आयुष्यातून वसूल होत असते. युद्धं सीमांवर लढली जातात, पण त्याची धग स्वयंपाकघरापर्यंत पोहोचते.
जोपर्यंत सामान्यांच्या चुलीला परवडणारा उजाळा मिळत नाही, तोपर्यंत प्रगतीच्या आणि विकासाच्या कथा अपूर्णच वाटतील. कारण एखाद्या देशाची खरी प्रगती तेव्हाच दिसते, जेव्हा त्या देशातील सामान्य माणसाची चूल निर्धास्तपणे पेटत असते.
लेखिका : प्रियंका वाकडे
Kavyank stories ✍️
मु. निकतवाडा पो. घोट
ता. चामोर्शी जि. गडचिरोली







