रामपूर वाचनालय बांधकामात निकृष्ट रेतीचा वापर? चौकशीची मागणी तीव्र

अमोल राऊत
संपादक
राजुरा : शहरालगत असलेल्या रामपूर येथे प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत सुमारे १ कोटी ५० लक्ष रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या सार्वजनिक वाचनालय इमारतीच्या बांधकामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी थेट आरोप केला आहे की, इमारतीत निकृष्ट दर्जाची रेती वापरली जात असून यामुळे बांधकामाची गुणवत्ता धोक्यात आली आहे.
रामपूर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हे वाचनालय ज्ञानाचे केंद्र ठरणार होते. ग्रामीण भागातील शैक्षणिक व बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी शासनाने मंजूर केलेला हा प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बांधकामात वापरली जाणारी रेती गाळयुक्त व निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, तांत्रिक निकषांनुसार ८ टक्क्यांपेक्षा जास्त गाळ असलेली वाळू वापरणे धोकादायक मानले जाते. अशा रेतीमुळे काँक्रीटची मजबुती कमी होते, भिंतींना तडे जाणे, प्लास्टर निखळणे आणि दीर्घकालीन टिकाऊपणावर परिणाम होण्याची शक्यता असते.
नागरिकांचा सवाल स्पष्ट आहे — “विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उभारल्या जाणाऱ्या इमारतीतच जर निकृष्ट साहित्य वापरले जात असेल, तर ही सरळसरळ जीवाशी खेळण्यासारखी बाब नाही काय?”
स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित बांधकाम विभागाने तात्काळ स्थळ पाहणी करून नमुने तपासावेत, दोषी आढळल्यास कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी व त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी ठाम मागणी केली आहे.
आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले असून, या गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन कारवाई होते का, याकडे रामपूरकरांचे डोळे लागले आहेत.





