“अभिनंदन आणि भिऊ नको ना गडे” – राजुरातील पहाटेच्या दारू संस्कृतीचं भयावह वास्तव

अमोल राऊत संपादक
राजुरा : सकाळच्या गुड मॉर्निंगचा एकच प्याला—दारूचे व्यसन जडलेल्या लोकांची वेळेआधीच मद्यतृष्णा भागवणाऱ्या मद्य विक्रेतांच्या कार्याचे सध्या राजुरा तालुक्यात जणू काही हार्दिक अभिनंदन होत असल्याचे चित्र आहे. मद्यपिना आणि मद्य विक्रेते एकमेकांना दिलासा देत म्हणतात—“भिऊ नको ना गडे”.
या दोन शब्दांत—“अभिनंदन आणि भिऊ नको ना गडे, तू विक सकाळी मी आहे तुझ्यासाठी”—राजुरा येथील मद्य विक्रेत्यांना एक वेगळीच ऊर्जा मिळाल्याचे दिसते. ही ऊर्जा इतकी प्रभावी ठरते की पहाटेच दारूची तृष्णा भागवणाऱ्या बार मालकाचे मद्याधिनांकडूनच हार्दिक अभिनंदन केले जाते. कारण या अभिनंदनामुळे आणि “भिऊ नको ना गडे” या आश्वासनामुळेच नियमांच्या आधी मद्यप्राशन करून देण्याचे जणू काही पुण्य लाभत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
जनतेत उपरोधाने चर्चा आहे की आता वृद्धाश्रम जसे आहेत, तसे “बाराश्रम” पण एकदाचे उघडावेत. सकाळपासून रात्रीपर्यंत दारू पाजणे, चकणा देणे, शुद्धीत असल्यास जेवण घालणे आणि तिथेच झोपेची सोय करणे—महिन्याला मेसप्रमाणे दारूची मेस लावून घेणे. किमान घरच्यांना तरी समाधान राहील की आपला माणूस दारू पिऊन रस्ते अपघातात मरणार नाही, तर “सुखरूप जिवंत” आहे!
या साऱ्या व्यंगात्मक वास्तवामागे एक गंभीर सत्य दडलेले आहे. ज्या यंत्रणेवर मद्यविक्रीवर वचक ठेवण्याची जबाबदारी आहे, तीच यंत्रणा जर हफ्तेखोरीच्या धोरणामुळे नियमांना तिलांजली देत असेल, तर सकाळीच मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य आणि त्यांचे कुटुंबीय किती त्रासदायक परिस्थितीत जगत असतील, याची कल्पनाही समाजाला अस्वस्थ करणारी आहे.
पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी कित्येक घरांची राखरांगोळी होत असताना, नियम धाब्यावर बसवून केवळ वरच्या कमाईसाठी अधिकारी आणि मद्य विक्रेते एकमेकांचे बळ बनत असल्याचे वास्तव समाज पाहत आहे. रक्षण करणारी यंत्रणा जेव्हा भक्षण करणारी बनते, तेव्हा समाज किती वेगाने खराब होतो, याचे हे जिवंत उदाहरण असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
अभिनंदन आणि भिऊ नको ना गडे—हे शब्द आज केवळ व्यंग उरले नसून, राजुरा तालुक्यातील दारू, व्यवस्था आणि समाज यांच्यातील धोकादायक साटेलोट्याचे प्रतीक बनले आहेत.








