Home चंद्रपूर पालक क्रीडा महोत्सवातून नगर परिषद शाळेची नवी ओळख; इंदिरा गांधी डिजिटल प्राथमिक...

पालक क्रीडा महोत्सवातून नगर परिषद शाळेची नवी ओळख; इंदिरा गांधी डिजिटल प्राथमिक शाळेचा वाखाणण्याजोगा उपक्रम

0
570

पालक क्रीडा महोत्सवातून नगर परिषद शाळेची नवी ओळख; इंदिरा गांधी डिजिटल प्राथमिक शाळेचा वाखाणण्याजोगा उपक्रम

अमोल राऊत

संपादक

 

राजुरा: दि. २० जानेवारी २०२६

नगर परिषद शाळा म्हणजे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून समाजघडणीचे केंद्र असू शकते, हे प्रत्यक्षात दाखवून देणारा आदर्श उपक्रम इंदिरा गांधी डिजिटल प्राथमिक शाळा, नगर परिषद राजुरा येथे क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने अनुभवायला मिळाला. क्रीडा महोत्सव अंतर्गत पालकांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. खो-खो, बॅडमिंटन, नृत्य, संगीत खुर्ची, फुग-फुग फुगा, ‘माझ्याकडे बघा’, बॉटल रेस अशा अनेक खेळांमुळे शाळेचा परिसर आनंद, हास्य आणि उत्साहाने दुमदुमून गेला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक अरुण रामचंद्रराव धोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून दिलीप डेरकर, संध्याताई चांदेकर, इंदुताई निकोडे, पुनम गिरसावळे, मंगला मोकडे तसेच अनंतकुमार ताजने व एजाज भाई यांची उपस्थिती लाभली.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. राजुरकर, उपाध्यक्ष दर्शना वाढई, श्री. रुपेश बोर्डे, श्री. चमनलाल डोंगरे, सर्व शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने पालकवर्ग बंधू-भगिनी या उपक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रम संपूर्ण दिवस मोठ्या उत्साहात पार पडला.

राजुरा येथे २०२३ मध्ये स्थापन झालेल्या या डिजिटल प्राथमिक शाळेने अल्पावधीतच गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत पालक-सहभाग वाढविण्यावर दिलेला भर विशेष ठरतो. पालकांनी घेतलेल्या क्रीडा प्रकारांमुळे ते जणू आपल्या बालपणीच्या शाळेतील आठवणींमध्ये रममाण झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. “शाळेमुळे आम्हाला पुन्हा एकदा बालपण जगता आले,” अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली.

हा उपक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून नगर परिषद शाळांविषयी समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा आणि सार्वजनिक शिक्षणव्यवस्थेकडे गांभीर्याने पाहण्याची डोळे उघडणारी बाब ठरली आहे. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे नगर परिषद शाळांबद्दल कृतज्ञता, विश्वास आणि अभिमानाची भावना समाजमनात अधिक बळकट होईल, यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!