Home चंद्रपूर राजुरा दररोज रात्रीचा ‘रेती खेळ’ उघड – राजुरात महसूल-पोलीस-रेती माफियांच्या संगनमताला जोरदार धक्का

दररोज रात्रीचा ‘रेती खेळ’ उघड – राजुरात महसूल-पोलीस-रेती माफियांच्या संगनमताला जोरदार धक्का

0
710

दररोज रात्रीचा ‘रेती खेळ’ उघड – राजुरात महसूल-पोलीस-रेती माफियांच्या संगनमताला जोरदार धक्का 

 

अमोल राऊत

संपादक

राजुरा | Impact 24 News

 

राजुरा: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका हा गौण खनिजांनी समृद्ध असतानाच, अवैध रेती उत्खननामुळे राज्य शासनाला कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचा फटका बसत असल्याचे वास्तव अनेक वर्षांपासून उघड आहे. महसूल व पोलीस विभागातील काही भ्रष्ट घटक आणि रेती माफिया यांच्या संगनमताने रात्रीच्या अंधारात चालणारा हा ‘रेती खेळ’ कितीही तक्रारी, निवेदने आणि वृत्तांकन होऊनही थांबत नव्हता.

मात्र १५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ठीक ११ वाजताच्या सुमारास हा खेळ उघड झाला. जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस चे नवनियुक्त उपजिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मूर्ती परिसरात मोठ्या प्रमाणावर रेवर्धा नदी पात्रातून रेती उत्खनन करून ती डंपिंग सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना फोन करून घटनेची माहिती दिली व संघटनेचे शहराध्यक्ष रोहित बत्तशंकर यांना मंडळ अधिकारी साळवे यांच्यासह घटनास्थळी पाठवले. प्रत्यक्ष कारवाईत अवैध रेती वाहतूक व साठवणूक सुरू असल्याचे रंगेहाथ आढळून आले.

कारवाईदरम्यान एक जेसीबी (MH-CD-6990), बिना नंबर प्लेटचा कुबोटा कंपनीचा ट्रॅक्टर आणि किमान आठ ब्रास रेती साठा जप्त करण्यात आले. दोन हायवा मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाले. मात्र त्यांचे वाहन क्रमांक MH-34-BZ-2784 व MH-34-BZ-2782 नोंदवून संबंधित वाहनमालकांना नोटीस बजावून तहसील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात यावे अशी विनंती सुरज ठाकरे यांनी तहसीलदार राजुरा यांना केली आहे.

तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांनी वेळेवर येऊन कारवाई केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी, प्रश्न कायम आहे—हा अवैध धंदा इतकी वर्षे चालू कसा होता? प्रशासनाच्या डोळ्यावरची पट्टी अखेर लोकप्रतिनिधी आणि संघटनांनी काढून दाखवली आहे.

सुरज ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे राजुरातील रेती माफियांना मोठा धक्का बसला असून, शासनाने आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!