नशेच्या गोळ्यांच्या अवैध विक्रीप्रकरणी चौथा आरोपी लक्कडकोट तालुका राजुरा जि.चंद्रपूर येथून जेरबंद
संपादक: अमोल राऊत
राजुरा: राजनांदगाव, दि. 26 ऑक्टोबर 2025
थाना सिटी कोतवाली व सायबर सेल राजनांदगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एनडीपीएस कायद्यांतर्गत नोंद असलेल्या प्रकरणातील चौथा आरोपी चंद्रपूर (महाराष्ट्र) येथून अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयीन कोठडीचा दाखला मिळाल्यानंतर आरोपीला जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले आहे.
या आरोपीकडून नाइट्रो-10 या नशेच्या गोळ्यांच्या खरेदी-विक्रीचे बिल, स्कॅनर आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच प्रकरणात आधीच 7 ऑक्टोबर 2025 रोजी तीन आरोपींना अटक करून तुरुंगात पाठविण्यात आले होते. पोलिस सूत्रांनुसार, नशेच्या गोळ्या, गांजा व अवैध दारू विक्रीविरोधात चालू असलेल्या मोहिमेअंतर्गत पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार न्यू चंद्रा कॉलनी परिसरात नाकाबंदी करून ट्रक (क्रमांक CG-08-AS-8158) ताब्यात घेण्यात आला. तपासात ट्रकमधून नाइट्रो-10 गोळ्या 190 नग (किंमत ₹1482), तीन टच-स्क्रीन मोबाईल (किंमत ₹30,000) आणि ट्रक (किंमत ₹12 लाख) जप्त केला. प्रकरणी गुन्हा नोंदवून तीनही आरोपींना अटक करण्यात आली.
चौकशीत या गोळ्या लाकडकोट, मदिना मेडिकल (ता. विरूर, जि. चंद्रपूर) येथून आणण्यात आल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी टीम तयार करून महाराष्ट्रात शोधमोहीम राबवली आणि साजिद कादर शेख (वय 30) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने नशेच्या गोळ्यांची विक्री केल्याची कबुली दिली.
या कारवाईत थाना प्रभारी निरीक्षक नंदकिशोर गौतम, उपनिरीक्षक राधेश्याम जुर्री, आरक्षक राजा बारले तसेच सायबर सेलच्या टीमची मोलाची भूमीका राहिली. पोलिसांनी अवैध नशेच्या व्यवहारांवर सतत छापे टाकण्याचा इशारा दिला आहे.






