Home चंद्रपूर चंद्रपूरातील RDSS वीज प्रकल्प स्थळांवर चोरट्यांचा हैदोस; पोलिस यंत्रणा झोपेतच?

चंद्रपूरातील RDSS वीज प्रकल्प स्थळांवर चोरट्यांचा हैदोस; पोलिस यंत्रणा झोपेतच?

0
175

चंद्रपूरातील RDSS वीज प्रकल्प स्थळांवर चोरट्यांचा हैदोस; पोलिस यंत्रणा झोपेतच?

 

राजुरा :

शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी RDSS (Revamped Distribution Sector Scheme) वीज प्रकल्पावर चोरट्यांनी अक्षरशः उघड युद्ध पुकारले असून, चंद्रपूर परिमंडळातील विविध प्रकल्प स्थळांवरून वीज वाहक तारा, लोखंडी खांब व कोट्यवधींचे साहित्य सातत्याने लंपास होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सार्वजनिक हिताचा हा प्रतिष्ठित प्रकल्प सध्या संघटित चोरट्या टोळ्यांच्या विळख्यात अडकला असून, प्रशासन व पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

ग्रामीण व आदिवासी भागातील वीज पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून जनतेला दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे. मात्र प्रत्यक्षात राजुरा, बल्लारपूर, वरोरा, चंद्रपूर ग्रामीण परिसरातील RDSS कामाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी निर्भयपणे चोरी होत आहे. वीज वाहक अ‍ॅल्युमिनियम तारा, कव्हर कंडक्टर, उभारलेले व साठवलेले लोखंडी पोल चोरून नेले जात असून, लाखो रुपयांचा सरकारी व कंत्राटी तोटा होत आहे.

 

धक्कादायक बाब म्हणजे, पोलीस गस्त वाढविणे, खासगी सुरक्षा रक्षक नेमणे, साहित्य साठवणूक ठिकाणे बदलणे अशा उपाययोजना करूनही चोरी थांबलेली नाही. यावरून चोरट्यांना कुणाचेही भय नसल्याचे स्पष्ट होते.

“आम्ही सर्वतोपरी खबरदारी घेत आहोत, मात्र या संघटित टोळ्या वारंवार रात्री हल्ले करत आहेत,” अशी स्पष्ट कबुली EPC एजन्सी मे. विश्वनाथ प्रोजेक्ट्स यांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

 

लाखो रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याने RDSS प्रकल्पाच्या कामाला मोठा विलंब लागत असून, खर्चात प्रचंड वाढ होत आहे. याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसणार असून, वीज पुरवठा सुधारणा कागदावरच राहते की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

या प्रकरणाची माहिती वारंवार प्रशासन व पोलिसांना देऊनही ठोस कारवाई होत नसल्याने “चोर मोकाट आणि यंत्रणा सुस्त” अशी स्थिती निर्माण झाली आहे. सार्वजनिक प्रकल्पांवर उघडपणे डल्ला मारणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई कधी होणार?

हा प्रश्न आता चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक विचारू लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!