Home चंद्रपूर राजुरा तालुक्यात बेकायदेशीर रेती तस्करीचा उधळलेला बाजार — प्रशासन ‘मूक प्रेक्षक’, नागवंश...

राजुरा तालुक्यात बेकायदेशीर रेती तस्करीचा उधळलेला बाजार — प्रशासन ‘मूक प्रेक्षक’, नागवंश युथ फोर्सकडून महसूल मंत्र्यांकडे तक्रार

0
254

राजुरा तालुक्यात बेकायदेशीर रेती तस्करीचा उधळलेला बाजार — प्रशासन ‘मूक प्रेक्षक’, नागवंश युथ फोर्सकडून महसूल मंत्र्यांकडे तक्रार

Oplus_131072

संपादक अमोल राऊत, राजुरा

राजुरा: राजुरा तालुक्यातील विहिरगाव, नलफडी, सातरी, चूनाळा, बामणवाड,आर्वी घाट, लक्कडकोट, विरुर,गोवरी,देवाडा, सिध्देश्वर,सोंडो,धोपटाळा, माडखांब (स्वामीच्या वाडी जवळ), कापनगाव, सुमठाना, विरुर खांबाडा वर्धा नदी लगत असलेले गाव परिसरात दिवसेंदिवस बेकायदेशीर रेती तस्करीचे साम्राज्य विस्तारत असून शासनाच्या महसुलाला कोट्यवधी रुपयांचा तोटा होत आहे. आश्चर्य म्हणजे ही तस्करी लोकांना उघडपणे दिसते, पण महसूल आणि पोलीस प्रशासन मात्र मूक प्रेक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे.

रात्रीच्या वेळी नदी व नाले पात्रांवरून ट्रॅक्टर, डंपर आणि हायवा वाहने रेतीने भरून मुक्तपणे फिरत आहेत, तर संबंधित अधिकारी आणि पोलीस निष्क्रियतेचा परमोच्च नमुना दाखवत आहेत. स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांकडून वारंवार तक्रारी व माहिती दिल्यानंतरही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या पार्श्वभूमीवर नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था, राजुराचे अध्यक्ष अमोल राऊत यांनी महसूल मंत्र्यांना निवेदन देऊन महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, “तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, तसेच विरुर व राजुरा पोलीस निरीक्षक हे सर्व अधिकारी जणू तस्करीचं संरक्षण करत असल्याचे चित्र रोज रात्री दिसते. नागरिकांकडून रेती वाहतुकीची टीप देऊनही प्रशासन गप्प आहे, हे दुर्दैवी आणि संशयास्पद आहे.”

राऊत यांनी शासनाला दिलेल्या निवेदनात पुढील मुख्य मागण्या केल्या आहेत —

रेती तस्करी थांबविण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर कारवाई करावी.

महसूल व पोलीस यांचे संयुक्त उड्डाण पथक तयार करून रात्रपाळी तपासणी करावी.

सर्व रेती घाटांवर सीसीटीव्ही व ड्रोन सर्व्हे सुरू करून पारदर्शक ई-लिलाव प्रणाली राबवावी.

हे निवेदन तहसीलदार राजुरा मार्फत महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, गृह मंत्रालय व जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “प्रशासनच गप्प राहिल्यामुळे रेती माफियांचे मनोबल वाढले आहे; अधिकारी पाहत असतानाच रेती चोरी होते, आणि शासनाचे कोट्यवधी महसूल बुडतात.”

राजुरा तालुक्यातील ही स्थिती प्रशासनाच्या निष्क्रियतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करते. जर लवकरच ठोस कारवाई झाली नाही, तर नागवंश युथ फोर्सने जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!