Home चंद्रपूर राजुरा नगरपरिषद निवडणूक : भाजपात उमेदवारीसाठी चुरस — राधेश्याम अडाणीया ठरू शकतात...

राजुरा नगरपरिषद निवडणूक : भाजपात उमेदवारीसाठी चुरस — राधेश्याम अडाणीया ठरू शकतात सशक्त चेहरा!

0
193

राजुरा नगरपरिषद निवडणूक : भाजपात उमेदवारीसाठी चुरस — राधेश्याम अडाणीया ठरू शकतात सशक्त चेहरा!

Oplus_131072

 

(विशेष प्रतिनिधी / Impact 24 News Portal)

राजुरा :राजुरा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचा राजकीय रंग दिवसेंदिवस गडद होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्र निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करताच स्थानिक राजकारणात नवी समीकरणं घडू लागली आहेत. यंदा अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने शहरातील अनेक राजकीय नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा फुलू लागल्या आहेत.

काँग्रेस, भाजप आणि शेतकरी संघटना हे तिन्ही पक्ष मुख्य लढतीत असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), राष्ट्रवादी (अजितदादा गट), वंचित बहुजन आघाडी, गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि आर.पी.आय. हे पक्षही मैदानात सज्ज आहेत.

भाजपाच्या दृष्टीने पाहता, गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार देवराव भोगळे यांनी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांचा पराभव करत सत्ता समीकरणात ऐतिहासिक उलथापालथ घडवली होती. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून या निवडणुकीतही काँग्रेसला मात देण्याची तयारी जोरात सुरू आहे.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपात सध्या राधेश्याम अडाणीया यांचे नाव चर्चेत आहे. ते मृदुभाषी, जनसंपर्कात निपुण आणि सर्व समाजातील लोकांशी सुसंवाद राखणारे नेते म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे, २०१६ मध्ये त्यांनी मुस्लीम बहुल क्षेत्रातून मोठ्या मतांनी विजय मिळवला होता, ज्यामुळे त्यांना सर्वसमावेशक चेहरा म्हणून मान्यता मिळाली आहे.

पक्षात विनायक देशमुख, सचिन डोहे, अनंता येरणे, सतीश धोटे, आणि सुरेश रागीट ही अन्य नावेही चर्चेत आहेत. परंतु, अडाणीया यांची सर्वसमावेशक प्रतिमा, संयमित राजकीय दृष्टिकोन आणि शहरातील जनाधार पाहता त्यांना सशक्त उमेदवार मानले जात आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि शेतकरी संघटना यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू असली तरी “कॉमन सिम्बॉल”च्या मुद्द्यावर दोघांमध्ये तिढा कायम आहे. तिढा सुटला नाही, तर दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

राजुराच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे —”या वेळी राजुरा नगरपरिषदेच्या शर्यतीत भाजपाचा रथ कोण ओढणार? आणि विजयाची कलगी कोणाच्या शिरपेचात रोवली जाणार?”

राजुरा नगरपरिषदेची निवडणूक २ डिसेंबर रोजी जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले असून, मतदार आता पक्षांच्या अंतिम उमेदवारीकडे उत्सुकतेने पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!