स्मशानभूमी वरच दोन गटात दबंग स्टाईल हाणामारी
मृतदेह बाजूला ठेवून दोन गटांतील दे-दणादण हाणामारीमुळे भितीचे सावट…
अहेरी, सुखसागर झाडे
अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत नागेपल्ली गावालगत असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गटात दबंगगिरीने हाणामारी झाली. अंतिम संस्कार करण्यासाठी गेलेल्या एका गटाला स्मशानभूमीवर अतिक्रमण करून बस्तान मांडलेल्या दुसऱ्या गटाने रोखले असता हा वाद उफाळून आला. यात काहीजण जखमी झाले असून त्यांच्या तक्रारीवरून 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघांना अटक करण्यात आली आहे.
नागेपल्ली येथील स्मशानभूमीच्या जागेवर बाहेरून आलेल्या काही लोकांनी बेकायदेशीरपणे वराहपालन सुरू केले होते. रविवारला गावातील एका व्यक्तीच्या अंतिमसंस्कारसाठी काही ग्रामस्थ स्मशानभूमीत गेले असता, अतिक्रमण करणाऱ्यांनी त्यांना अडवण्याच्या प्रयत्न केला. यामुळे जोरदार वादावादामुळे ताणतणाव निर्माण झाले. काही वेळातच वादा
ने हिंसक वळण घेतले आणि दोन्ही गटांत लाठ्या काठ्यांनी हाणामारी झाली. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेची चित्रफित सार्वत्रिक झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सदर जागा अनेक वर्षांपासून स्मशानभूमी म्हणून वापरली जाते. यापूर्वी ग्रामपंचायत नागेपल्ली च्या मदतीने दोन वेळा अतिक्रमण हटवण्यात आले होते. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे पुन्हा बेकायदेशीरपणे वराहपालन सुरू करण्यात आले.
सदर घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली अहेरी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटांना मध्यस्थी करून परिस्थिती आटोक्यात आणली. पोलिसांनी सांगितले की अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार असून तपास सुरू आहे.
या घटनेनंतर गावात भीतीचे व अस्वस्थतेचे वातावरण पसरले असले तरी पोलिसांच्या कारवाईनंतर शांतता व सुव्यवस्था राखली जाईल. अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.









