दीक्षाभूमीवरील कार्यक्रमासाठी शासन प्रशासनाने विनाविलंब पुढाकार घ्यावा : बसपा
2 ऑक्टोंबर रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी देश विदेशातून येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी सुविधा, सुव्यवस्था आणि सुरक्षितते संदर्भात तत्काळ कार्यवाही सुरू करावी या मागणीसाठी बसपाच्या शिष्टमंडळाने नागपूर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना व संबंधितांना एक निवेदन दिले. शिष्टमंडळात प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवड़े, नागपुर जिला प्रभारी राजकुमार बोरकर, जिला महासचिव चंद्रशेखर कांबले, रोहित ईलपाची, पश्चिम नागपुर विधानसभा अध्यक्ष अंकित थूल, उत्तर नागपूरचे राजेश नंदेश्वर, अविनाश गेडाम, हिंगणा चे स्वप्निल ढवळे उपस्थित होते.
धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्ताने नागपुर च्या दीक्षाभूमीवर दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून व विदेशातून सुद्धा लाखो अनुयायी येतात. दीक्षाभूमीवर होणाऱ्या ह्या वैचारिक व सांस्कृतिक महोत्सवाला दरवर्षी मनपा प्रशासन एक हजार तात्पुरते शौचालय व स्नानगृहे उभारते. ही सुविधा दरवर्षी कमीच पडते. तरीही ह्यावेळी या संख्येत भर न घालता, उलट घट होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण जेल परिसरात शौचालय असतांना जेल प्रशासनाने जाणीवपूर्वक पक्की कंपाऊंड वॉल उभारली असून अनुयायांची शौचाबाबतची गैरसोय निर्माण केली आहे. त्याच धर्तीवर आयटीआय परिसरात देखील तात्पुरत्या शौचालयाच्या त्याच जागेवर सुरु असलेल्या बांधकामांमुळे अनुयायांची गैरसोय होणार आहे. याकडे बसपा नेत्यांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.
दिक्षाभूमी परिसरात गर्दीमुळे आधीच जागा कमी पडते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपातील शौचालये व स्नानगृहांची संख्या ह्यावेळी किमान दीड हजार (1,500) इतकी असणे अत्यावश्यक आहे. मात्र, त्यासाठी पर्यायी जागांच्या पूर्वतयारी बाबत प्रशासनाने आत्तापर्यंत कोणतीही सूचना किंवा निर्देश जाहीर केलेले नाहीत. सदर विषयावर शासन, प्रशासन, स्मारक समितीद्वारे आतापर्यंत काहीही निश्चित ठरवण्यात आलेले नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी याच दीक्षाभूमीवर स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. त्यामुळे या स्थळाला आंतरराष्ट्रीय महत्त्व आले. म्हणूनच शासनाने दीक्षाभूमीला पर्यटन स्थळाचा अ दर्जा दिला आहे. याचे सौंदर्यीकरण व विस्तारीकरणाच्या साठी 200 कोटीचे बजेट सुद्धा मंजूर करण्यात आलेले आहे. परंतु महाराष्ट्र शासन जमीन देण्यास चालढकल करीत आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी असूनही शासन-प्रशासनाने याची गंभीर दखल घेतल्याचे दिसत नसल्याचाही आरोप बसपा ने करुन सदर बाब हि अत्यंत गंभीर असून मा. मुख्यमंत्री यांनी तातडीने जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त व इतर संबंधित संस्थांची एक संयुक्त बैठक बोलावून जेल परिसर तसेच आयटीआय मधील असलेले शौचालये व स्नानगृहे उभारणीचे नियोजन तात्काळ सुरू करावे अशीही कळकळीची विनंती केलेली आहे.
मागील वर्षीचा व यापूर्वीचा पावसाचा अनुभव लक्षात घेता दीक्षाभूमी परिसरात चिखल होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आतापासून बोल्डर, मुरूम, चुरी, रेती टाकून त्यावर रोलर ने घोटाई करावी. दीक्षाभूमी परिसरातील शासकीय, निमशासकीय इमारती तसेच शाळा, कॉलेज खुल्या करून दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना निवारा तसेच दीक्षाभूमी परिसरातील रामदासपेठ, लक्ष्मीनगर, वसंत नगर, सामाजिक न्याय भवन, आरोग्य विभाग, आयटीआय, रेल्वे स्टेशन आदि ठीकाणी असलेल्या मैदानात, खुल्या जागेत वॉटरप्रूफ टेंट बांधून निवाऱ्याची, आरोग्याची, खाणपान व स्वच्छता ची तसेच येण्या जाण्यासाठी शहरभर बसेसची तात्पुरती सोय उपलब्ध करण्याची सूचना बसपा ने केली.
बुद्ध फुले शाहू आंबेडकरी अनुयायांची वाढती संख्या, त्यांची भावना व त्यांची आवश्यकता लक्षात घेऊन शासन-प्रशासना द्वारे तत्काळ आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी बसपाने संबंधिताकडे केली आहे.








